आधी सत्तेतील सहभाग नाकारणारी शिवसेना नंतर सत्तेत सहभागी झाली. त्याचप्रमाणे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला सेनेचा विरोध मावळून त्यांचे मतपरिवर्तन होईल, असा उपरोधिक टोला केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी येथे लगावला. जैतापूर प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेनेसोबत चर्चा करीत असून त्या चर्चेतून तोडगा निघून हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असा दावाही गोयल यांनी या वेळी केला.
सत्तेतील वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारने ‘जनकल्याण पर्व’ हाती घेतले असून या कार्यक्रमांतर्गत सरकारच्या कामांविषयी माहिती देण्याकरिता गुरुवारी गोयल ठाण्यात आले होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. विजेची समस्या सोडविण्याकरिता तब्बल सहा महिने राज्यातील आघाडी सरकारकडे वेळ मागितली जात होती. मात्र त्यासाठी आघाडी सरकारने वेळ दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या चर्चेनंतर यासंबंधी एक बैठक झाली. मात्र त्यातही ठोस तोडगा निघाला नाही, असे गोयल यांनी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच विजेचा प्रश्न सोडविण्याकरिता सहा महिन्यांत तीन बैठका घेतल्या आणि त्यात ठोस निर्णय घेतले. यामुळे वीजनिर्मितीत वाढ झाली असून कोळशाचा प्रश्न निकाली निघाला आहे, असा दावाही गोयल यांनी केला. तसेच २०२२ पर्यंत देशात सौरऊर्जेच्या माध्यमातून एक लाख मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्याचा विचार असून या योजनेमुळे देशातील विजेचा प्रश्न सुटेल. तसेच महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक ऊर्जासंबंधी एक प्रस्ताव तयार केला असून त्यामुळे पुढील काही वर्षांत राज्य देशातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असेल, असा दावाही केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी केला.