News Flash

वाहनावरील झेंडा पाहूनच भांडणाचा अंदाज..

दहा वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचेही तिने सांगितले.

महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या शशिकांत कालगुडेला हातकडय़ा ठोकण्यात आल्या. तर वरील छायाचित्रात सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झालेले मारहाणीचे दृश्य. 

मारहाण प्रकरणी पोलीस महिलेची प्रतिक्रिया

‘त्या’ वाहनातील पक्षाचा झेंडा पाहून तो नक्कीच आपल्याशी भांडणार, याचा अंदाज मला आला होता, पण अंगावर हात उचलेल इतके क्षणभरही वाटले नव्हते, असे शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कलगुडे यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक शाखेतील ‘त्या’ पोलीस महिलेने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तसेच या घटनेनंतर माहेर आणि सासर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच सहकारी पाठीशी उभे राहिल्याने मोठा धीर मिळाल्याचेही तिने सांगितले.

सातारा जिल्हय़ातील वाई तालुक्यातील रहिवासी असून तिथे आमचे एकत्रित कुटुंब आहे. चुलत भाऊ भारतीय सैन्यामध्ये आहे. त्याचाच आदर्श ठेवून मी दहा वर्षांपूर्वी पोलीस दलात दाखल झाले. तीन वर्षे मुख्यालयात नोकरी केल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून वाहतूक शाखेत कार्यरत आहे. यामुळे नियमभंग करणाऱ्या चालकास अडविल्यानंतर ते कशा पद्धतीने वागू शकतात, याचा थोडाफार अंदाज मला आता येतो. त्याचप्रमाणे त्या दिवशी ‘त्या’ वाहनातील पक्षाचा झेंडा पाहून तो नक्कीच आपल्याशी भांडणार, याचा अंदाज मला आला होता, पण अंगावर हात उचलेल असे क्षणभरही वाटले नव्हते, असेही तिने सांगितले. दहा वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचेही तिने सांगितले.  साहेब.. वाहन परवाना द्या.. अशी त्याच्याकडे विचारणा करताच त्याने शिवीगाळ सुरू केली. यातूनच झालेल्या वादातून त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच ‘तुला माहीत नाही, मी कोण आहे, तुला बघून घेईन,’ अशी धमकीही त्याने दिली.

पतीचा पाठिंबा

चार वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले मी बेस्टमध्ये वाहक पदावर काम करतो. आम्हाला दोन वर्षांची मुलगी आहे. घटनेच्या दिवशी घरामध्ये टीव्ही पाहत असताना झोप लागली. दरम्यान, टीव्हीवरील बातम्यांमधील चित्रफीत पाहून मुलीने मला उठवले आणि मम्मीला मारत असल्याचे तिने मला सांगितले. त्यानंतर हा प्रकार मला समजला. या घटनेनंतर तिच्या पाठीशी उभा राहिलो, असे ‘त्या’ महिला वाहतूक पोलिसाच्या पतीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2016 3:34 am

Web Title: shiv sena leader beats up woman constable in thane
टॅग : Shiv Sena,Thane
Next Stories
1 मीरा-भाईंदर अर्थसंकल्पातील योजना कागदावरच
2 तुम्ही जागा द्या, आम्ही सुविधा देतो!
3 वसईत आता महिला रिक्षासारथी
Just Now!
X