अनैतिक संबंधामुळे भाडोत्री मारेकऱ्यांकरवी कृत्य

शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी निमसे यांची पत्नी वैशाली आणि अन्य दोघांना अटक केली. अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत लग्न करण्याचा निर्णय शैलेश यांनी घेतला होता. तसेच वैशालीला मारहाण करून तिच्या नावे असलेली मालमत्ताही आपल्या नावे करून घेतली होती. या रागातूनच वैशाली हिने निमसे यांच्या हत्येची दीड लाखांची सुपारी दिली. विशेष म्हणजे, ठरल्याप्रमाणे शैलेश यांची हत्या करून त्यांचा मृतदेहही अर्धवटपणे जाळण्यात आला. मात्र, अंत्यविधीसाठी मृतदेह मिळावा म्हणून तो अर्धवट जाळण्याची सूचना वैशालीने मारेकऱ्यांना केली होती, अशी बाबही तपासात पुढे आली आहे.

भिवंडीतील देवचोळे गावाजवळ शुक्रवारी सकाळी शैलेश निमसे यांचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. गळा आवळून खून केल्यानंतर त्यांची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रमोद वामन लुटे (३२) याला अटक केली आणि त्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये वैशाली हिने दीड लाखांची सुपारी देऊन ही हत्या केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी या दोघांनाही अटक करण्यात आली असून उर्वरित दोघा आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी दिली. शैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांनी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या कारणावरून शैलेश आणि त्यांची पत्नी वैशाली यांच्यात वारंवार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर वैशालीच्या जबरदस्तीने सह्य़ा घेतल्या होत्या. तसेच तिच्या नावावर असलेली मालमत्ताही स्वत:च्या नावे केली होती. या रागातूनच वैशाली हिने ही हत्या घडवून आणली, अशी माहिती पोलिसांनी दिली. निमसे यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या प्रमोद लुटे याला या कामासाठी एक लाख रुपये देण्यात आले होते व नंतर ५० हजार देण्याचे ठरले होते.

हत्येचा कट

वैशाली हिने महिनाभर आधी शैलेश यांच्या हत्येचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी तिने घराचा आणि बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला होता. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस एका दुचाकीवरून प्रमोद आणि अन्य दोघेजण घराजवळ आले. घरात प्रवेश करून त्यांनी रश्शीने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर शैलेश यांच्या कारच्या डिकीमध्ये त्यांचा मृतदेह टाकला आणि तो भिवंडीतील देवचोळे गावातील जंगलात नेऊन जाळला.