काही दिवसांपूर्वी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली आणि काही दिवसांनी त्यांची सुटका झाली. त्यानंतर शिवसेना आणि मनसे हा वाद रंगला आहे. आम्ही त्यांना एक दिवस घरातून अशाच प्रकारे उचलून नेऊ असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.

“अविनाश जाधव काल मी व्हिडीओ पाहिला. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मला तुझ्यावर फार दया आली. जेव्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतो तेव्हा मलाही तू सामान्यांच्या प्रश्नासाठी लढत असल्याचं वाटतं. परंतु गेल्या वर्षभरामध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीनं सर्वांनी दहिहंडीचा उत्सव रद्द केला तेव्हा जाणीवपूर्वक दहिहंडीचं आयोजन केलं. कधी भाजपाच्या नेत्याच्या मांडीवर तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मांडीवर. गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात असलेलं वातावरण तू बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेस,” असा आरोप सरनाईक यांनी अविनाश जाधव यांच्यावर केला आहे.

“लोकशाहीमध्ये काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ कोणत्याही प्रकाचा गैरवापर करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवायची हे योग्य नाही. जे शिवसेनेनं ठाणे, पालघरसाठी केलं ते इतिहास आहे. घरातून आम्हाला उचलण्यासाठी आम्ही काही चिल्लर आहोत का? आमच्या एखाद्या तरी कार्यकर्त्यांला उचलून नेण्याची हिंमत दाखव,” असं आवाहनही सरनाईक यांनी जाधव यांना दिलं.

शिवसैनिकाला उचलणं माझा धंदा नाही – जाधव

“मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक शिवसैनिकाचा आदर करतो आणि कोणत्याही शिवसैनिकाला उचलणं माझा धंदा नाही. आपण सर्व बाळासाहेबांच्या मुशीतील आहोत आणि आम्हाला राज ठाकरे यांची शिकवण आहे. शिवसैनिकांबद्दल आमच्या मनात आदर आहे. परंतु जेव्हा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा त्यावर का वक्तव्य केलं नाही?,” असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.