कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील सिमेंट-कॉँक्रीटचे रस्ते तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी सत्ताधारी शिवसेना नेत्यांनी कंबर कसली आहे. महापालिकेतील सत्तेच्या खुर्चीत विराजमान होण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण आणि खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे आश्वासन दिले होते. आता पाच वर्षे संपून नव्याने निवडणुका जवळ आल्या तरी कामे मात्र संथगतीने सुरू आहेत.
त्यामुळे मतदारराजाला पुन्हा सामोरे जाताना ‘करून दाखवलं’ असे सांगण्यासाठी तरी ‘काहीही करा पण रस्ते पूर्ण करा’, असे आर्जव शिवसेनेच्या नेत्यांनी अभियांत्रिकी विभागाला केले आहे.
कल्याण डोंबिवलीतील सर्व प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे हे रस्ते खणून ठेवले आहेत. रडतखडत सुरू असलेल्या या कामांमुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी होत असून रहिवाशी हैराण बनले आहेत. त्यामुळे सिमेंट रस्ते कामांचा आढावा घेऊन ही कामे येत्या महिनाभरात पूर्ण करता येतील का या दृष्टीने शिवसेनेचे नेते प्रयत्न करू लागले आहेत. मागील चार वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांचे ठोस असे नियोजन झालेले नाही. प्रकल्प विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे सिमेंट रस्ते कामाचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
सत्ताधारी शिवसेना-भाजपसह विरोधी बाकावरील मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत या कामांकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे अभियंता विभागानेही या कामांकडे बेफिकीरीने पाहिले.
या कामांचे वेळोवेळी तिऱ्हाईत परीक्षण होणे व त्याची अंमलबजावणी वेळेत होणे आवश्यक होते. ती झालेली नाही.  सिमेंट रस्ते तयार करताना रस्त्यांच्या बाजूकडील सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कामे सुरू झाल्यानंतर उपस्थित झालेल्या या प्रश्नामुळे या कामासाठी ५० ते ६० कोटी रुपयांच्या वेगळ्या निविदा काढण्याचे प्रयत्न झाले.
नेत्यांच्या फे ऱ्या.. पदाधिकाऱ्यांची तारांबळ!
महापालिकेच्या निवडणुका उंबरठय़ावर आल्याने आता शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली याचा आढाव थेट ‘मातोश्री’वरून घेतला जात आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची तारांबळ सुरू झाली असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली शहरात सुरू असलेली संथगती कामे आणि त्याच्यावर पदाधिकाऱ्यांचा नसलेला वचक यामुळे नाराज असल्याचे बोलले जाते. येत्या आठ महिन्यांनंतर नागरिकांसमोर विकासाचा कोणता अजेंडा घेऊन जायचा, असा प्रश्न खुद्द पालकमंत्र्यांना पडला आहे. रखडलेल्या सिमेंट रस्त्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे निवडणुकांना सामोरे जाताना नागरिकांना काय उत्तर द्यायचे या विवंचनेत सेना नेते आहेत. त्यामुळे पालिका पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त आयुक्त मधुकर अर्दड यांच्यामागे सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा, असा धोशा या पदाधिकाऱ्यांनी लावला असल्याचे समजते.