स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळविल्याने आनंदात असलेल्या शिवसेनेला स्थायी समितीत संख्याबळ जुळविण्यासाठी मात्र पुन्हा एकदा राजकीय कसरती कराव्या लागत असून स्थायी समितीत शिवसेना आणि विरोधी पक्षांचे संख्याबळ समान होत असल्याने सभापतीची निवड चिठ्ठीवर होऊ नये यासाठी शिवसेनेने काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांवर गळ टाकल्याची चर्चा रंगली आहे. या सत्तासमीकरणामुळे भाजपचाही भाव कमालीचा वधारला असून फोडाफोडीचे राजकारण करीत बसण्यापेक्षा भाजपला जवळ घ्या, असा सूरही शिवसेनेच्या एका गटातर्फे आळवला जात आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपचे २३, काँग्रेसचे तीन आणि इतर चार नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे आव्हान असतानाही महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यात शिवसेनेला यश आले. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत एकहाती यश संपादन केल्यानंतर आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आठ नगरसेवकांमागे एक सदस्य अशा पद्घतीने १६ सदस्य स्थायी समितीमध्ये पाठविले जातात आणि त्यामधून सभापतिपदाची निवड केली जाते. महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादीचे चार, भाजपचे तीन सदस्य निवडून जाणार आहेत. तसेच काँग्रेसचे तीन आणि इतर चार नगरसेवक यांना राष्ट्रवादीची साथ मिळाली तर त्यांचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. त्यामुळे स्थायी समितीमधील सदस्यांचे संख्याबळ समसमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिकेची तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवायचे असेल तर शिवसेनेला नऊ सदस्यांचे गणित जुळवावे लागणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार रवींद्र फाटक हे त्या वेळेस काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार होते. या निवडणुकीत समसमान मतदान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली होती. त्या वेळेस फाटक विजयी झाल्याने शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने आता स्थायी समिती सभापती पदावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी काँग्रेस पक्षाची मदत घेण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेसचे वर्तकनगर भागातील नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याशी शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्क साधल्याची चर्चा आहे. स्थायी समितीत शिवसेनेला काँग्रेसने मदत केली तर शिवसेनेला स्थायी समिती काबीज करणे सोपे जाणार आहे. तसेच या निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात काँग्रेसला स्थायी समिती सदस्य पद देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

महापालिकेत सर्वात मोठा विरोधी गट असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ हवी असली तरी त्या बदल्यात स्वीकृत सदस्य निवडणुकीत या पक्षाला मदत करावी का याविषयी राष्ट्रवादीच्या गोटात संभ्रम आहे. स्थायी समितीमधील वर्चस्वाच्या या लढाईत एरवी कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना मात्र भलतेच महत्त्व आले आहे.