साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अंबरनाथ शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने नुकतेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खुल्या नाटय़गृहाचे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. परंतु या नाटय़गृहाच्या लोकार्पणावरून नवाच वाद उफाळून आला असून, मनसेने या कार्यक्रमावर हरकत नोंदविली आहे. मनसेचे नगरसेवक दत्तात्रय केंगरे व स्वप्निल बागूल या दोन नगरसेवकांच्या प्रभागांच्या मध्यभागी असलेल्या या नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आमच्याच पुढाकाराने मंजूर करण्यात आल्याचे बागूल यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने या नाटय़गृहाचे घाईने उद्घाटन केल्याचा त्यांचा दावा आहे. एकूण ३० लाख रुपये खर्चाच्या या योजनेत खुले नाटय़गृह हा फक्त एक भाग आहे. या प्रकल्पातील उर्वरित कामे अद्याप पूर्णत्वाला गेलेली नाहीत. येथील ड्रेसिंग रूम, नाटय़गृहासमोरील नियोजित उद्यान, बालोद्यान, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, लॉन, ओपन जिम, वाचनालय, वृक्षारोपण अशी बहुतेक  कामे बाकी आहेत.
‘राजकारण नाही’
अंबरनाथमध्ये यापूर्वी यशवंतराव चव्हाण खुले नाटय़गृह अस्तित्वात होते, परंतु शहरात पार्किंगच्या व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्या जागी बहुमजली वाहनतळ, बंदिस्त नाटय़गृह व खरेदी बाजार संकुल बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. पडीक भूखंडावर हे नाटय़गृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकरही उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. त्यात राजकारण नाही, असे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्पष्ट केले.
संकेत सबनीस, अंबरनाथ