नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना अंबरनाथमधील सत्ताधारी शिवसेनेत पक्षांतर्गत वाद उफाळून आला असून शहरातील भुयारी गटाराची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा मुद्दा पुढे करीत पक्षाचे शहराध्यक्ष अरिवद वाळेकर यांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्याच विरोधात वाळेकर यांनी शड्ड ठोकल्याने सेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाटय़ावर आली आहे.
अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे शहराध्यक्ष असलेले वाळेकर यांनी या अपूर्ण आणि अर्धवट कामांच्या विरोधात आवाज उठवला आहे. ही कामे आठवडाभरात पूर्ण करा, अन्यथा आंदोलनास तयार राहा, असा इशारा वाळेकर यांनी दिला आहे. हा इशारा देताना त्यांनी शहरात जागोजागी फलक उभारले आहेत. शहरात सत्ता असली तरी नागरी कामांसाठी आपण आक्रमक आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने केला असला तरी त्यातून पक्षातील बेदिली उघड झाली आहे. शिवसेनेच्या या खराब रस्त्यांच्या भागातील विभागप्रमुख व शाखाप्रमुखांनी या कामांबाबत तक्रारी करूनदेखील प्रशासनाने कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरप्रमुख म्हणून मी हा इशारा दिला आहे. यात राजकारण करण्याचा हेतू नाही, असे वाळेकर यांनी स्पष्ट केले. तर शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी ८ मार्चपर्यंत या मार्गावरील कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे नगराध्यक्ष चौधरी यांनी सांगितले.