राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेने कॉँग्रेस-राष्ट्रवादीची साथ धरली असली तरी ठाणे जिल्ह्य़ातील पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा भाजपला पसंती देत युती केली आहे. त्यामुळे ठाण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना-भाजपकडेच सत्तेची सूत्रे राहावी यावर स्थानिक नेत्यांचा भर दिसत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकास आघाडी राहील ही घोषणा तूर्त तरी हवेतच विरल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील पाच पंचायत समित्यांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यापैकी शहापूरमध्ये शिवसेना आपल्या बळावर सत्तेवर आहे. तरीही भाजपने त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. तर मुरबाडमध्ये भाजपकडे स्वबळावर सत्ता आहे. कल्याण, भिवंडी व अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या साथीने सत्ता मिळवण्याची कॉंग्रेस-राष्ट्रवादीला संधी होती. मात्र या तिन्ही ठिकाणी शिवसेनेने भाजपला पसंती देत राज्यातील सत्तेतील सहकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेपासून दूर ठेवले.

कल्याणमध्ये १२ सदस्यांच्या पंचायत समितीत शिवसेना व राष्ट्रवादीकडे ७ सदस्यांसह बहुमत झाले असते. मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजपशी युती करत सत्ता स्थापन केली. भिवंडीत कॉंग्रेसला शिवसेनेच्या सोबतीने सत्तेत जाण्याची संधी होती. पण शिवसेनेने भाजपला पसंती देत सभापतीपद मिळवले व भाजपला उपसभापतीपद दिले. अंबरनाथमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपशी हातमिळवणी केली. याबाबत विचारले असता, शिवसेना-भाजप युती ही बरीच जुनी आहे. मागील पाच वर्षांत त्यात बरेच चढ उतार आले असले तरी स्थानिक पातळीवर बहुतांशपणे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांसोबत असणे जास्त सोयीचे वाटते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह त्यांचे फारसे पटत नाही. त्यात राज्यस्तरावर महाविकास आघाडीत राजी-नाराजी नाटय़ सुरू असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर जुनी शिवसेना-भाजप युती कायम ठेवण्याकडे पसंती आहे, असे एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.