News Flash

सत्ता युतीची.. जल्लोष फक्त सेनेचा!

शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांची मिरवणूकही पालिका मुख्यालय परिसरात काढण्यात आली.

गेल्या २० वर्षांतील कल्याण आणि डोंबिवली या शहरांच्या वाढत्या बकालपणाबद्दल टीकेचे धनी ठरलेल्या शिवसेनेवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवून सत्ता स्थापनेची संधी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरात शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर महापालिका मुख्यालय परिसरात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सेना नगरसेवकांची मिरवणूक निघाली. (छायाचित्र : दीपक जोशी)

कल्याण-डोंबिवलीची सत्ता हाती घेताना भाजपमध्ये शुकशुकाट
निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर केलेले आरोप ‘विसरून’ जात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजप एकत्र आले असले तरी, प्रचारकाळातील चिखलफेकीचे डाग दोन्ही पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही कायम आहेत. त्यामुळेच बुधवारी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी निवड होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तर दुसरीकडे, या जल्लोशाकडे भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांनी पाठ फिरवून सारे काही आलबेल नसल्याचे दाखवून दिले.
कल्याण-डोंबिवलीतील गेल्या २० वर्षांतील अपयशी कामगिरी आणि भाजपने घेतलेली फारकत यांमुळे कोंडीत सापडूनदेखील पालिकेत पुन्हा सत्ता काबीज करता आल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळेच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबासह बुधवारी कल्याण-डोंबिवलीत हजर होते. त्यांनी महापालिकेत येऊन नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर यांचे अभिनंदन करून त्यांना खुर्चीत स्थानापन्न केले. त्यानंतर नव्या महापौरांना घेऊन त्यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. या वेळी रश्मी ठाकरे, आदित्य, खा. अनिल देसाई, अभिनेते आदेश बांदेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचे महापालिकेत आगमन होताच शिवसैनिकांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी निवड होताच, त्यांच्या पत्नी, आई, सासुबाई, दोन्ही कंपन्यांनी त्यांना सभागृहात औक्षण केले. तसेच शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांची मिरवणूकही पालिका मुख्यालय परिसरात काढण्यात आली.

टिळा, फेटा आणि नाराजी
महापौर शिवसेनेचा झाला असला तरी पक्षांतर्गत नाराजी येत्या काळात सेनेला आव्हान ठरणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट दिसून आले. महापौर निवडणुकीसाठी सेनेचे नगरसेवक सफेद पेहराव व भगवा फेटा तर नगरसेविका भगव्या साडय़ा परिधान करून आले होते. मात्र, महापौरपदासाठी डावलण्यात आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुक ऱ्या म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे हे दोघे मात्र भगवा फेटा न बांधता शेवटच्या बाकावर बसले होते. सेनेच्या काही ज्येष्ठ मंडळींनी म्हात्रे यांना बळजबरीने पहिल्या बाकावर आणून बसवले. मात्र, त्यांची नाराजी लपून राहिली नाही. महापौरपदाची स्वप्ने पाहणाऱ्या दीपेश म्हात्रे यांनाही शिवसेनेने ठेंगा दाखवला. त्यामुळे तेही नाराज झाल्याची आता चर्चा आहे. या नाराजी-नाटय़ाचा पहिला अंक त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांनी उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची तयारी करून पूर्ण केला आहे. तर बुधवारी सभागृहात दीपेश म्हात्रे निळा शर्ट परिधान करून आले तेव्हा अनेकांचे डोळे विस्फारले. त्यांनीही भगवा फेटा परिधान केला नव्हता.

शहराचे आरोग्य आणि कीर्ती ही सार्वजनिक स्वच्छतेवरून ठरत असते. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरे नियमित स्वच्छ राहतील असा आपला प्रयत्न असणार आहे. स्वच्छतेबाबत घनकचरा विभागातील वाहने, वाहन चालक, साधने, कामगार हे जे काही अडथळे आहेत; ते प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
– राजेंद्र देवळेकर, महापौर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 3:07 am

Web Title: shiv sena rajendra devalekar become mayor of kdmc
Next Stories
1 शहर स्वच्छतेला प्राधान्य
2 सात दशकांची बावनकशी परंपरा
3 ‘सीएचएम’तर्फे वृद्ध, कुष्ठरोगी नागरिकांना दिवाळी भेट
Just Now!
X