मुंब्य्राच्या पलीकडे ‘नवे ठाणे’ वसविले जात असल्याची जाहिरात करत गृहेच्छुकांना आकर्षित करू पाहणाऱ्या मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘जिव्हाळय़ा’चा मुद्दा ठरलेला कल्याण-शीळ मार्गावरील १२ मीटर रुंदीच्या सेवामार्गाचा (सव्‍‌र्हिस रोड) प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने फेटाळून लावला आहे. कल्याण-शीळ मार्गावरील लोढा बिल्डरच्या ‘पालवा’ या विशेष नागरी वसाहतीनंतर या भागात गृहप्रकल्पांच्या उभारणीला वेग आला असताना महापालिकेतील सत्ताधारी पक्षानेच या सेवामार्गाला खो देऊन बांधकाम व्यावसायिकांची कोंडी केली आहे. यामागे तांत्रिक कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जात असले, तरी हा प्रस्ताव फेटाळून शिवसेनेने भाजपलाच मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे.
 मुंब्राच्या पलीकडे ठाणे महापालिकेच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणावर मोकळ्या जागा शिल्लक असल्याने बिल्डरांनी गेल्या काही वर्षांपासून या भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. घोडबंदर मार्गावर उभ्या राहिलेल्या बडय़ा संकुलांमधील घरांचे भाव एव्हाना प्रति चौरस फुटास नऊ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. तुलनेने कल्याण-शीळ मार्गावर हे दर अजूनही चार ते पाच हजार रुपयांच्या घरात आहेत. मुंब्रा-डायघर भागात दोस्ती समूहाने गृहप्रकल्पाची पायाभरणी सुरू करताच घोडबंदर मार्गावरील मोठय़ा बिल्डरांनीही या मार्गाकडे आपला मोर्चा वळविला आहे. राज्य सरकारने आखलेल्या विशेष नागरी वसाहत धोरणाच्या माध्यमातून याच मार्गावर लोढा उद्योग समूहाच्या मोठय़ा गृह प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. डोंबिवली आणि दिवादरम्यान उभा राहणाऱ्या या प्रकल्पाची बांधकाम क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असली, तरी दळणवळणातील अडचणी हा या भागातील सर्वच गृहप्रकल्पांमधील प्रमुख अडचण आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवा आणि डोंबिवली स्थानकातील प्रवाशांची गर्दी दुपटीने वाढली आहे. तसेच शीळ-कल्याण मार्गावरून पुणे, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाह्य़वळण रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही बडय़ा विकासकांच्या गृहप्रकल्पांसाठी अडसर ठरू लागली आहे.
या पाश्र्वभूमीवर तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी कल्याण-शीळ मार्गावर दोन्ही बाजूस १२ मीटर रुंदीचे सेवा रस्ता उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्य सरकारच्या एका नियमाचा दाखला देत सेवा रस्त्यांच्या उभारणीचा हा प्रस्ताव पुढे करण्यात आला होता. याशिवाय शिळफाटा चौकापासून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर नऊ मीटर रुंदीचा सेवा रस्ता उभारण्याचे ठरविण्यात आले होते. यानुसार आरक्षण बदल निश्चित करण्यात येणार असल्याने यासंबंधी हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली जावी, असे या प्रस्तावात म्हटले होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. भाजपशी संबंधित मुंबईतील एका बडय़ा विकासकाच्या गृहप्रकल्पासाठी या रस्त्याचा बेत आखण्यात आल्याचीही चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगत होती. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी आता हा प्रस्तावच फेटाळून लावला आहे. ‘बिल्डरांच्या सोयीसाठी हे आरक्षण बदल असल्याची चर्चा असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे,’ अशी माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
ठाणे शहरात विकास आराखडय़ानुसार रस्ते बांधणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असताना सेवा रस्त्यांच्या या प्रस्तावाची गरज काय, यासंबंधीचा ठोस खुलासा प्रशासनाने केला नाही, म्हणून प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचेही ते म्हणाले
जयेश सामंत, ठाणे