राज ठाकरे यांनी आपल्या कल्याण डोंबिवलीतील प्रचार सभेत नाशिकच्या विकास कामांची चित्रफीत दाखवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जी विकास कामे त्यांनी केलीच नाहीत ती दाखवून नाशिकमधील कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप नाशिक येथील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे दावे फसवे असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांची चित्रफित दाखविली. याच धर्तीवर कल्याण डोंबिवली पालिकेतही एक हाती सत्ता द्या या पालिकेचाही चेहरामोहरा बदलवून दाखवू असे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मतदारांना आवाहन केले. याविषयी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत हेही उपस्थित होते.
बडगुजर म्हणाले, राज ठाकरे हे न केलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यावरील टीका ही त्यांनी मफलरचा गळा आवळेपर्यंत केली. मात्र नंतर त्याच आघाडी सरकारसोबत अभद्र युती करत त्यांनी नाशिकमध्ये सत्ता हस्तगत केली. साधुग्राममधील साधूंची सेवा ज्या कर्मचाऱ्यांनी केली त्या तेराशे कर्मचाऱ्यांचा पगार थकविण्यात आला आहे.
तसेच नाशिक महापालिकेने कोटय़ावधीचा भूखंड विनापरवाना नाशिक फास्ट या संस्थेला दिल्याचा आरोप मनसेच्याच एका नगरसेवकाने केलेला आहे. अशाप्रकारे मनसेच्या नाशिक पॅटर्नची चिरफाड बजगुजर यांनी पत्रकार परिषदेत केली.