पारसिक नगरमधील प्रकल्पाला पाठिंबा देण्याची खेळी निवडणुकीत भोवण्याची चिन्हे

कळवा येथील पारसिक नगर भागातील भर वस्तीत उभारण्यात येत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा मुद्दा आता राजकीय वळण घेऊ लागला आहे. पालिका आयुक्तांच्या रेटय़ामुळे सुरू झालेल्या प्रकल्पाच्या बांधकामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने प्रकल्प उभारणीला पाठबळ दिले होते. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये सेनेविरोधात प्रचंड नाराजी असून आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला या परिसरातून हद्दपार करायचे, अशी मोहीम सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.

स्थानिकांचा विरोध डावलून पारसिक नगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाविरोधात सुरुवातीपासूनच नागरिकांनी आंदोलन उभारले आहे. स्थानिक नागरिकांची सनदशीर मार्गे आंदोलने सुरू असतानाच या प्रकल्पासाठी भूखंड हस्तांतर होण्यापूर्वीच ठेकेदाराला आठ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिल्याच्या मुद्दय़ावरून हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात सापडला. राज्याच्या नगरविकास विभागाने याची दखल घेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून याबाबत अहवाल मागवला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या बांधकामास स्थगितीही दिली.

प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत असताना पालिका आयुक्तांनी पुन्हा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेनेही या कामी पुढाकार घेत प्रकल्पासाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेण्यात आला. विशेष म्हणजे, हे करण्यासाठी महापौर संजय मोरे यांनी तहकूब केलेली सर्वसाधारण सभा पुन्हा बोलावण्यात आली व हा विषय त्यात मांडण्यात आला. या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विरोधही डावलण्यात आला. यावरून या प्रकल्पासाठी   शिवसेनाच अधिक आग्रही असल्याचा मतप्रवाह स्थानिकांमध्ये आहे. परिणामी येथील नागरिकांनी थेट सेनेविरोधात दंड थोपटले आहेत.

येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकविण्याचा निर्धार येथील रहिवाशांनी केला आहे. तशा आशयाचे संदेश सोशल मीडियाद्वारे व्हायरल होऊ लागले आहेत. नव्या प्रभाग रचनेत कळवा-मुंब्रा विभागातील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. आधीच या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. त्यात आता पारसिक नगरमधील नागरिकांच्या रोषाची भर पडली आहे. त्यामुळे पारसिक नगरमधील रहिवाशांशी संवाद साधा, त्यांच्या भावना समजून घ्या, अशी कळकळीची विनंती स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली असल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात स्थानिकांनी सोशल मीडियाद्वारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना एक खुले पत्र पाठविले असून त्यात त्यांच्या मनातील अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे भाजपवर कुरघोडी करण्याच्या नादात येथील हक्काच्या जागा धोक्यातआल्याने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.