मतांची पळवापळवी रोखण्यासाठी सतर्क; नगरसेविकेच्या संभाव्य पक्षांतराच्या बातमीने खळबळ

ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजाराला अक्षरश: ऊत आला असून शिवसेनेची ठाण्यातील एक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळपात जात असल्याची माहिती मिळताच सतर्क झालेल्या शिवसेना नेत्यांनी पक्षाच्या नगरसेवकांची नाकेबंदी सुरू केली आहे. मंगळवारच्या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या शिवसेना नेत्यांनी दगाबाजी होऊ नये यासाठी युतीच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या असून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक मताची कल्पना मिळू शकेल, अशा स्वरूपाची रणनीती आखली जात आहे.

१९९२ पासून सलग २४ वर्षे ठाणे स्थानिक संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर अधिराज्य गाजविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांना शिवसेनेने यंदा कडवे आव्हान उभे केले असून पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी व्यक्तिश: ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत शिवसेनेने उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे यंदाही शिवसेनेसोबत हातमिळवणी करून विजयाचे डाव‘खरे’ होणार असा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात शिवसेनेने रवींद्र फाटक यांना िरगणात उतरवून डावखरे यांना जोरदार आव्हान उभे केले असून फाटक यांच्या उमेदवारीमुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांची मते गळाला लावण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी शिवसेनेची ठाण्यातील एक नगरसेविका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आल्याचे वृत्त बाहेर येताच शिवसेना नेते कमालीचे सतर्क झाले असून शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांच्या हालचालींवर पक्ष नेतृत्वाकडून बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या काही दिवसांतच युतीच्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविले जाणारे असून राज्यातील वेगवेगळ्या भागात त्यांना ठेवले जाणार आहे. दरम्यान, युतीचे एकही मत फुटू नये म्हणून विशेष रणनीती आखली जात असून प्रत्येक मताची कल्पना मिळेल अशापद्धतीने रणनीती आखली जात आहे. यासाठी कोणते हातखंडे वापरायचे याबद्दल शिवसेनेच्या ठरावीक नेत्यांची ठाण्यात बैठक झाल्याचे सांगण्यात येते. एकही नगरसेवक डावखरे यांच्या गळाला लागू नये यासाठी काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही वृत्त आहे.