कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसांत प्रत्येकी ३१०० रुपये दराने ५३५ इच्छुक अर्जाची विक्री
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती होणार किंवा नाही या विषयी वेगवेगळे तर्क लढविले जात असतानाच पित्रुपक्षाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने तब्बल १२२ प्रभागांतील इच्छुकांसाठी अर्जाची विक्री सुरू केली. ही विक्री करत असताना एका अर्जाची किंमत तब्बल ३ हजार १०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल ५३५ अर्जाची विक्री झाली असून काही लाख रुपयांचा गल्ला सेनेच्या तिजोरीत जमा झाला आहे. येत्या काळात ही विक्री आणखी वाढवून निवडणूक निधी जमवण्याचा संकल्प शिवसेना नेत्यांनी सोडला असून अर्जाची किंमतही वाढवली जाणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या शिवसेनेसाठी यंदाची निवडणूक कसोटीची ठरणार आहे. सत्तेच्या काळात कल्याण-डोंबिवली शहरांच्या नियोजनाचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. तरीही स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणीच्या जोरावर यंदाही सत्तेचा सोपान गाठता येईल असा विश्वास शिवसेना नेत्यांना वाटत आहे. या निवडणुकीत भाजपशी युती व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी भिवंडीचे भाजप खासदार कपील पाटील यांना यासाठी गळ घातली असून काहीही झाले तरी युती करा, असा िशदे यांचा आग्रह आहे. भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण वगळता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र युती नको, असाच सूर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत युती होणार किंवा नाही याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात असले तरी शिवसेना नेत्यांनी तब्बल १२२ प्रभागांमधील इच्छुकांसाठी अर्जविक्री सुरू केली आहे.

कल्याणमधून ३००, डोंबिवलीत २५०अर्जाची विक्री
या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची रांग लागली असून ही संख्या लक्षात घेऊन अर्जविक्रीतून निधी उभारण्याची खेळी पक्षाकडून करण्यात आली आहे. पितृपक्षात अर्जविक्रीवर होणारा परिणाम लक्षात घेता गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने अर्जाची विक्री सुरू केली. कल्याण विभागातून आतापर्यंत सुमारे ३०० तर डोंबिवलीतून अडीचशेच्या आसपास अर्जाची विक्री झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, एका अर्जाची किंमत सुमारे तीन हजार १०० रुपये इतकी ठरविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या माध्यमातून काही लाखांची रक्कम पक्षाच्या तिजोरीत जमा झाली असून येत्या काळात इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.