ठाणे जिल्ह्यात ‘लहान भावा’च्या भूमिकेत जाण्याची भीती

जयेश सामंत, ठाणे</strong>

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे बडे नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचे वारे वेगाने वाहू लागताच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. एकीकडे, नाईक यांच्या भाजपप्रवेशामुळे नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांवरील आपला दावा जाण्याची भीती शिवसेनेला सतावत आहेच; पण त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक विधानसभा जागांवर भाजपकडून आतापासूनच दावा केला जाऊ लागल्याने जिल्ह्यात शिवसेना मागे ढकलली जाईल, अशी भीती पक्षातील नेतेमंडळींना वाटू लागली आहे.

पाच वर्षांपुर्वी देशभर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही नवी मुंबईत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता आणली होती. निवडून आलेल्या पाच अपक्षांना साथीला घेत आणि कॉग्रेससोबत समझोता करत नाईक यांनी गेली चार वर्षे नवी मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली आहे. राज्य सरकारने सुरुवातीला आक्रमक तुकाराम मुंढे आणि त्यानंतर रामास्वामी एन यांच्यासारख्या कडव्या शिस्तीचे आयुक्त नवी मुंबई महापालिकेत पाठवून गणेश नाईक यांच्या सत्तेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर हा लगाम असह्य झाल्याने अखेर नाईक पुत्र आमदार संदीप यांच्या आग्रहास्तव बुधवारी गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

नाईक यांच्या पक्षांतरामुळे एकीकडे त्यांचे समर्थक नगरसेवक आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्यात चैतन्य संचारले असले तरी, शिवसेनेतील नेतेमंडळींनी या घडामोडींची धास्ती घेतली आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या आमदार असून ऐरोलीतील विद्यमान आमदार संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघावर युतीतील भाजपचा दावा आता प्रबळ झाला आहे. नवी मुंबईतील बेलापूर किंवा ऐरोली या दोनपैकी एक मतदारसंघांवर सुरुवातीपासून शिवसेनेचा दावा राहीला आहे. पक्षाचे उपनेते विजय नहाटा गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी कामाला लागले आहेत. नाईक यांच्या प्रवेशामुळे हे दोन्ही मतदारसंघ हातातून निसटतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील कल्याण पुर्व या मतदारसंघातील विद्यमान आमदार गणपत गायकवाड हेदेखील भाजपच्या वाटेवर असून असे झाल्यास कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली, कल्याण पुर्व आणि कल्याण पश्चिम या तीनही मतदारसंघावर भाजपचा दावा रहाणार आहे. याठिकाणी शिवसेनेची मोठी ताकद असून हे तीन मतदारसंघ भाजपला सोडण्यास शिवसेनेचा आतापासूनच विरोध आहे. उल्हासनगरातील विद्यमान आमदार ज्योती कलानी भाजपच्या वाटेवर असून हा मतदारसंघही भाजपला वाटय़ाला जाण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी सद्यस्थितीत भाजपकडे आठ, शिवसेनेकडे सहा तर राष्ट्रवादीकडे चार असे संख्याबळ आहे. नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपकडे नऊ तर ज्योती कलानी यांच्या नियोजीत प्रवेश झाल्यास दहा जागांचे संख्याबळ होईल. कळवा-मुंब्रा मतदारसंघाची अवघड जागा शिवसेनेच्या पदरात टाकली गेल्यास ठाणे जिल्ह्यात जागावाटपातही शिवसेना लहान भावाच्या भूमीकेत असेल याविचारानेच पक्षाच्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

ठाण्यावर दावा?

युतीच्या चर्चेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागायचा अशी रणनिती या पक्षाच्या गोटात आतापासून आखली जात आहे. मात्र, ठाणे महापालिका क्षेत्रात भाजपच्या वाटय़ाला ही एकमेव जागा असून संघाच्या एका मोठय़ा वर्तुळात ती शिवसेनेस देण्यास विरोध आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना डावलावे, अशी काय कारणे आहेत, असा सवालही भाजपच्या वर्तुळातून केला जात आहे. त्यामुळे ठाणे शहरावरील शिवसेनेच्या दाव्याला विरोध होण्याची शक्यता आहे.