ठाणे शहरात दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून झपाटय़ाने सुरू झालेल्या विकासकामांवर आरूढ होत सत्ताधारी शिवसेनेने शुक्रवारी शहरभर केलेल्या वातावरणनिर्मितीतून महापालिकेत मित्रपक्ष असलेल्या भाजपला मात्र पूर्ण बेदखल केल्याचे चित्र दिसून आले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेले शहरातील मॉडेल रस्ते, रुग्णालय, उद्याने तसेच विविध विकासकामांचे काडीचेही श्रेय भाजपच्या पदरात पडणार नाही याची पुरेपूर काळजी शिवसेना नेत्यांची घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असून, पाच वर्षांपूर्वी अटीतटीच्या महापौर लढतीत शिवसेनेच्या विजयात भाजपच्या आठ नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरली होती. स्थायी समितीचे अखेरच्या वर्षीचे सभापतीपद भाजपला देऊन शिवसेनेने या मदतीची परतफेडही केली होती. मुंबईसह ठाण्याची निवडणूक यंदा स्वतंत्रपणे लढविण्याची चाचपणी या दोन्ही पक्षांनी सुरू केली असून गेल्या काही महिन्यांपासून भाजपने त्यादृष्टीने उमेदवारांची जुळवाजुळवही सुरू केली आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी गेल्या दीड वर्षांपासून येथील कारभारावर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा एकहाती वरचष्मा राहिला आहे. ठाण्यातील रस्ते रुंदीकरण, बेकायदा बांधकामांवर कारवाई, वायफाय, सीसी टीव्ही, सिग्नल शाळा, तलावांचे सौंदर्यीकरण यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत शिवसेनेपेक्षा जयस्वाल अधिक चर्चेत राहिले. शहरातील मॉडेल रस्त्यांच्या उभारणीची संकल्पनाही जयस्वाल यांनीच पुढे आणली. आयुक्तांनी अत्यंत आग्रहाने राबविलेल्या या प्रकल्पांचा राजकीय लाभ भाजपच्या स्थानिक नेत्यांना घेता आला नसला तरी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना मात्र या कामांचे श्रेय पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले.

भाजप, जयस्वालही दूरच

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांचे लोकार्पण करता येत नाही हे लक्षात आल्याने शुभारंभ सोहळ्यांना पाहणी दौऱ्याचे नाव देत शिवसेनेने कार्यक्रम उरकला. आचारसंहितेमुळे जयस्वालही कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत आणि भाजपच्या स्थानिक आमदारांनाही दूर ठेवण्यात शिवसेनेला यश आले.

शहरातील विकासकामांचा पाहणी दौरा म्हणजे शेवटच्या षटकांमध्ये अतार्किक फटकेबाजी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. ठाणे शहराचा विकास कोण करतंय आणि मुख्यमंत्री ठामपणे कुणामागे उभे आहेत हे येथील मतदार जनतेला चांगले ठाऊक आहे.  -संजय केळकर, आमदार, भाजप

  • ठाणे शहरात सीसी टीव्ही कॅमेरे तसेच वायफाय यंत्रणा उभारणीचे महत्त्वाचे प्रकल्प संजीव जयस्वाल यांनी अंतिम टप्प्यात आणले आहेत. घोडबंदर मार्गावर काही एकरांमध्ये उभारण्यात येणारे शहर उद्यानांचे प्रकल्पही आयुक्तांच्या पाठपुराव्याचे द्योतक आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे असा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र, स्थानिक भाजप नेते त्यातही कमी पडल्याचे दिसून आले.