उपनगराध्यक्ष पदावरून आरोप-प्रत्यारोप; पालकमंत्र्यांवर टीकास्त्र

राज्यात मित्रपक्ष असूनही एकमेकांना कायम पाण्यात पाहणाऱ्या आणि एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांतील मतभेद आता टोकाला गेले आहेत. बदलापूरमध्येही उपनगराध्यक्ष पदावरून सुरू झालेल्या वादाने आता टोक गाठले आहे. याबाबतीत विधान परिषद निवडणुकीपूर्वी पालकमंत्र्यांनी भाजपला दिलेला शब्द पाळला नसल्याचा स्पष्ट करीत, यापुढेही पालिकेतील कारभाराबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारेन, कारण तो माझा हक्क आहे, असे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेला सुनावले आहे. त्यामुळे बदलापूरमधील युतीचा डाव अवघ्या तीन महिन्यांत मोडल्यात जमा आहे.

गेल्या महिनाभरापासून शिवसेना आणि भाजपमध्ये उपनगराध्यक्ष पदावरून वाद पाहायला मिळत आहे. यात स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पालिकेला लिहिलेल्या पत्रांमुळे सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष पद भाजपला देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे भाजपनेही दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली .याच विषयावर वादासाठी कारण ठरलेल्या आमदारांची प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे एका पत्रकार परिषदेत आमदार किसन कथोरे यांनी आपली भूमिका मांडली. विधान परिषद निवडणुकीत उपनगराध्यक्ष पद मागण्यासाठी आम्ही गेलो नव्हतो. पालकमंत्र्यांनीहा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळण्याची गरज होती. मुदतीत आपल्या पक्षाच्या उपनगराध्यक्षाचा राजीनामा घेणे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तो करार न पाळल्याने आम्ही सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे तूर्तास आम्ही सत्तेतून बाहेर पडलो आहोत. पुढे वरिष्ठांच्या बैठकीनंतर आलेल्या आदेशाचे आम्ही पालन करू, असेही कथोरे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकल्प राबविण्यात पालिका कुचकामी

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर निधी आणला गेला आहे. मात्र तो योग्यरीत्या वापरण्यात पालिका असमर्थ ठरली आहे. सध्या पालिका क्षेत्रात पालिकेचे सुरू असलेले असे कोणतेही काम दिसत नाही. त्यामुळे नागरिकांकडून घेतल्या जाणाऱ्या कराचे काय होते, असा सवाल उपस्थित करत कथोरे यांनी पालिकेने कर वसूल केला नाही तरी विकासकामे होतील, असे स्पष्ट केले. या वेळी भुयारी गटार योजनेतील जोडणीसाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कालाही त्यांनी विरोध दर्शविला. केंद्र आणि राज्य सरकारचा निधी वापरण्यात पालिका अकार्यक्षम ठरते आहे. नाटय़गृह, स्टेडियम असे विविध प्रकल्प राबविण्यात पालिका निष्क्रिय ठरली असून पालिकेला स्वत:चे मुख्यालय नाही, हे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.