News Flash

दिव्यातील खड्डय़ांवरून भाजपचे शिवसेनेवर बाण!

पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करण्याचा प्रयत्न

भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करण्याचा प्रयत्न; परिसरात तणावाचे वातावरण

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने बुधवारी दिवा शहरातील खड्डय़ांच्या मुद्दय़ावर आंदोलन छेडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. दिव्यातील प्राथमिक सुविधांच्या समस्येकडे पालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकत्र्य़ानी पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दिवा परिसरात मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोघा नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. नव्या प्रभाग रचनेत दिव्यातून चार नगरसेवकांचा एक पॅनल तयार होण्याची चिन्हे असून त्यामुळे सर्वच पक्षांनी या भागात लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेची या भागातील तयारी लक्षात घेऊन भाजपनेही या भागात जोर लावला असून ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून या भागात तळ ठोकल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत दिवा परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण झाले आहे. या परिसराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधा मिळत नसल्याची ओरड दिवावासीयांकडून सातत्याने होत आहे. याच मुद्दय़ावरून दिवावासीयांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. रहिवासी आंदोलनाच्या गरम तव्यावर पोळी भाजून घेत भाजपनेही आता शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. दिव्यातील रस्ते तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक, आमदार आणि महापालिका प्रशासनाला बुद्धी द्या, असे साकडे घालत भाजपचे दिव्यातील सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी महापालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करून त्याला साकडे घालण्याचा अपयशी प्रयत्न बुधवारी केला.

आंदोलन ठरल्याप्रमाणे मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते बुधवारी सकाळी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या दिशेने निघाले. त्याच वेळी मुंब्रा पोलिसांनी त्यांची गाडी अडविली आणि त्यांच्याकडील गणेशमूर्ती ताब्यात घेतली.

तसेच काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले तर काही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून महापालिका मुख्यालय परिसरात आले. या कार्यकर्त्यांनी दुसरी गणेशमूर्ती खरेदी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी कारवाई

दिव्यातील समस्या सोडविण्यासाठी पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. या पाश्र्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना नोटीस दिली होती; पंरतु त्यांनी नोटीसचे उल्लंघन करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 2:57 am

Web Title: shiv sena vs bjp in thane 2
Next Stories
1 २० हजार कर्मचाऱ्यांवर संकट
2 कल्याणच्या गणेश घाटावर विजेचा लपंडाव
3 पॉवरलिफ्टिंगमध्ये महिला अव्वल
Just Now!
X