किसननगरच्या पादचारी पुलावरून जुंपली; शिंदे-घाडीगावकर यांच्यात अहमहमिका

ठाणे महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच किसननगर भागातील पादचारी पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप-शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात येत असल्याचे फलक शिवसेनेने या परिसरात लावले आहेत. दरम्यान, नगरसेवक असताना दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही कामे सुरू झाल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केला आहे. त्यामुळे या दोन पक्षांत जुंपली आहे.

घाडीगावकर यांनी चार दिवसांपूर्वीच या कामाचे उद्घाटन स्थानिक रहिवाशांच्या हस्ते केले होते. असे असतानाही दोन दिवसांनंतर शिवसेनेने पुन्हा त्याच कामांचा शुभारंभ केला. श्रेयवादाच्या या लढाईत युतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली असून पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या बालेकिल्ल्यातच भाजप आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे येथील किसननगर भागातून मुलुंड परिसरात एक मोठा नाला वाहतो. श्रीनगर, निशिगंधा सोसायटी, काळूशेठ चाळ, प्रियदर्शनी इमारत या परिसरातून हा नाला जातो. या भागातील नाल्याचे आरसीसी बांधकाम करण्यास आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाल्यावर पादचारी पूल बांधण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. या कामासाठी एक कोटी ९० लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. परंतु या कामाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये लढाई सुरू आहे.

माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच पोटनिवडणूक घेण्यात आली. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असतानाही घाडीगावकर यांनी अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख यांना निवडून आणले. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याने निवडणुकीनंतर शिवसेना विरुद्ध घाडीगावकर असा सामना वागळेत रंगला आहे.

घाडीगावकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजप नेत्यांचे पाठबळही त्यांना मिळू लागले आहे. असे असतानाच आता पादचारी पुलाच्या कामावरून घाडीगावकर आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

‘शिवसेनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न’

तीन वर्षांपूर्वी नगरसेवक असताना नाल्याचे आरसीसी बांधकाम आणि पादचारी पुलाचे काम करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता. त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने त्यास मान्यता देऊन एक कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला. २० जानेवारीला सर्वसाधरण सभेत सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर झाला. मे महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, विधान परिषद निवडणूक आचारसंहिता, पावसाळा व प्रभागातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता यामुळे कामांचे उद्घाटन होऊ शकले नव्हते. त्यामुळे ११ नोव्हेंबरला स्थानिक रहिवाशांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करून घेण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून या कामाकरिता  निधी देण्यात आला असल्याचे फलक लावून महापौर संजय मोरे यांच्या हस्ते याच कामांचे पुन्हा भूमिपूजन करण्यात आले आहे, असा दावा माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केला आहे. तसेच शिवसेनेने एकप्रकारे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार केला असून यापूर्वीही जयभवानीनगर जलकुंभाच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे काम महापालिकेचे!

स्थानिक नागरिकांची मोठी मागणी असल्याने महापालिकेने या कामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे या कामात राजकारण करण्याचा किंवा श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर संजय मोरे यांनी दिली.