कळवा रुग्णालयातील चित्रफीत समाजमाध्यमांवर

धरणाअभावी फसलेले पाणीधोरण, कचराकोंडी आदी इतर मुद्दय़ांचा संदर्भ देऊन येत्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीने आता त्यात कळवा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात सापडलेल्या झुरळालाही ओढून आणले आहे.  झुरळाची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित करून राष्ट्रवादीने रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे.

गेली २५ वर्षे सत्तेवर असलेल्या शिवसेनेला नागरी सुविधा पुरविण्यात अपयश आल्याचा दावा करत त्याच मुद्दय़ांवरून राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पाणी, धरण, कचराभूमी अशा सुविधांपासून ठाणेकर वंचित असल्याचा दावा करत शहरात फलकबाजी सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेच्या कारभारावर टीका केली होती. तसेच गेल्या २५ वर्षांत पाण्यासाठी ३५०० कोटी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप केला होता. एकूणच महापालिकेतील विविध नागरी सुविधांच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीने निवडणुकीमध्ये शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यापाठोपाठ आता कळवा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात सापडलेल्या झुरळाची चित्रफीतही समाजमाध्यमांवर प्रसारित करून त्याद्वारे शिवसेनाविरोधी प्रचार सुरू केला आहे.

एक होते झुरळ..

काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्या वेळी शस्त्रक्रिया विभागामध्ये झुरळ सापडले होते. त्याची चित्रफीत महिनाभरापूर्वी माध्यमांच्या हाती लागल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे निघाले होते. सत्ताधारी शिवसेनाही त्यामुळे चांगलीच अडचणीत आली होती. नेमकी हीच बाब हेरून राष्ट्रवादीने शिवसेनाविरोधात प्रचारासाठी झुरळ प्रकरणाची चित्रफीत वापरण्यास सुरुवात केली आहे.