नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या सूचना

गेल्या वीस वर्षांपासून एकाच प्रभागातून निवडून येणाऱ्या, प्रभागात सुभेदारासारखे वावरणाऱ्या शिवसेनेच्या जुन्या-जाणत्या नगरसेवक, नगरसेविकांना या वेळी अजिबात उमेदवारी देऊ नका. या प्रभागांमधून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांना विजयी करा, असे आदेश शिवसेनेच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा, स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

वर्षांनुवर्षे नगरसेवक होऊन शहर विकास, नागरी हिताची कामे करण्यापेक्षा या जुन्या-जाणत्या नगरसेवकांनी पालिकेचा अड्डा करून ठेवला आहे. याची जाणीव शिवसेना नेतृत्वाला झाली असल्याने, जुन्या एकाही नगरसेवकाला उमेदवारी देण्याचा विचार करू नका. वीस वर्षे पालिकेत नगरसेविका राहून, अडीच वर्षे महापौरपद उपभोगून गेल्या दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडे ओला-सुका कचरा म्हणजे काय, असा प्रश्न करणाऱ्या शिवसेनेच्या एका नगरसेविकेला तर अजिबात उमेदवारी देऊ नका, असे ज्येष्ठ सेनानेत्याने जिल्हा नेत्यांना बजावले आहे. या बडबडबाज नगरसेवकांमुळे पक्ष नाहक बदनाम होत चालला असल्याच्या तक्रारी ‘मातोश्री’वर निष्ठावान शिवसैनिकांनी केल्या आहेत.

सध्या शिवसेनेच्या पालिकेतील कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या सेना नेतृत्वाने जुने-जाणते नाराज झाले तरी चालतील, त्या प्रभागांमधून चांगले नवे कोरे उमेदवार शोधा. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या असल्याचे सूत्राने सांगितले. कल्याण-डोंबिवलीत एकूण २५ ते ३० ठिकाणांहून शिवसेनेचे ठरावीक उमेदवार वर्षांनुवर्षे निवडून येत आहेत. रामदास पाटील हे शिवसेनेचे नगरसेवक वीस वर्षांत एकदाही सभागृहात एक शब्द बोलले नाहीत. या प्रभागातील निष्ठावान शिवसैनिकांना हे जुने-जाणते उमेदवारीसाठी वाव देत नसल्याने, निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या वेळी पक्ष-नेतृत्वानेच मातब्बरांना घरी बसविण्याच्या सूचना केल्याने, निष्ठावान गटात समाधान व्यक्त केले जात आहे.

पालिकेतील पदावरून अलीकडे पायउतार झालेल्या शिवसेनेच्या एका सर्वोच्च पदाधिकाऱ्याच्या विरोधात ‘मातोश्री’वर अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या पदाधिकाऱ्यालाही या वेळी उमेदवारी देऊ नये. या पदाधिकाऱ्यामुळेही पक्ष अधिक

बदमान झाल्याचे ‘मातोश्री’ला जाणकार मंडळींनी कळविले आहे. हा पदाधिकारी आपल्या स्वत:च्या घरात तीन जणांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.