News Flash

ग्रामीण भागांतही सेनेचे ठाणे

शिवसेनेने यंदा प्रथमच मोठा विजय संपादन केल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही राजकीय वजन वाढले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत  समिती निकालानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.  (छायाचित्र : दीपक जोशी)

जिल्हा काबीज करण्याच्या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग

देशभरात आलेल्या भाजप लाटेतही ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेसह ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात वर्चस्व कायम ठेवणाऱ्या शिवसेनेने ठाणे जिल्ह्यातील आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालाने भाजपच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जाणारे भिवंडीचे भाजप खासदार कपील पाटील यांचे भिवंडीतील र्वचस्व मोडीत निघाले असून मुरबाडमध्ये आमदार किसन कथोरे यांनाही शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीने घाम फोडल्याचे पाहायला मिळाले.

एकेकाळी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रणसंग्रामात शिवसेनेने यंदा प्रथमच मोठा विजय संपादन केल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही राजकीय वजन वाढले आहे. ठाणे जिल्हा परिषदेवर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत देशात वाहू लागलेले काँग्रेसविरोधी वारे लक्षात घेऊन कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्य़ात कधी नव्हे ते कमळ फुलण्यास सुरुवात झाली. भिवंडी लोकसभेसारखा एकेकाळचा काँग्रेसचा गड कपिल पाटील यांनी मोदी लाटेत शिवसेनेच्या मदतीने भाजपकडे खेचून आणला. तेव्हापासून जिल्ह्य़ात कपिल पाटील यांचे राजकीय महत्त्व वाढू लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख मिरवणारे खासदार पाटील यांच्याकडे पक्षाने ठाणे विभागीय अध्यक्षपदही सोपवले. त्यामुळे खासदार पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा असा कारभार गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात सुरू होता. भाजपमधील जुन्या जाणत्यांना पाटील आणि कथोरे यांच्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात फारसे स्थान राहिले नसल्याच्या कुरबुरीही दबक्या आवाजात सुरू होत्या. राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे कपिल पाटील, किसन कथोरे या भाजप नेत्यांसोबत राजकीय वैर स्पष्ट दिसत होते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पाटील-कथोरे या जोडगोळीला धडा शिकवायचा असा विडा उचलत शिवसेनेने यंदा राष्ट्रवादीला सोबत घेत निवडणुकीची रणनीती आखली होती. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी बेरजेचे गणित करत काही ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही जवळ घेतले होते. याचा एकत्रित परिणाम जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच गणांमध्ये दिसून आला .

ठाणे जिल्हा परिषदेत सत्तास्थानी पोहचण्यासाठी भिवंडीतील २१ तर शहापूरातील १४ जागा निर्णायक मानल्या जात होत्या. भिवंडी हा खासदार कपिल पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने येथून भाजपला निर्णायक यशाची अपेक्षा होती. मात्र, २१ पैकी नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने या ठिकाणी भाजपला धक्का दिला. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचा अवघ्या ३३ मतांनी झालेला पराभव पक्षासाठी धक्कादायक ठरला. शहापूर तालुक्यात मात्र शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवला. या ठिकाणी राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळवला असून भाजपला येथून खातेही उघडता आले नाही. शहापूर तालुक्यातील गटांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती नव्हती.

नोटावाढले

निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास ‘यापैकी कुणीही नाही’, अर्थात नोटाचा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. ठाणे जिल्हा परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनीही मोठय़ा प्रमाणावर नोटाच्या पर्यायाला पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे. अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिकमतदान नेवाळी गटात झाले. याठिकाणी तब्बल ९१४ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. आठ गणांमध्ये मिळून एकूण एक हजार ९६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याचे आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:16 am

Web Title: shiv sena win thane zp election 2017
Next Stories
1 परीटघडीच्या गर्दीत लक्षवेधी ‘हाफ पँट’
2 पोलिसांच्या ‘बुलेट’ला ठाणे पालिकेची ‘किक’
3 ग्रामीण भागांत भाजपची वजाबाकी
Just Now!
X