कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उपमहापौरपदी भाजपचे विक्रम तरे विराजमान झाले आहेत.

महापौरपदासाठीच्या शर्यतीत देवळेकर यांच्यासोबत भाजपकडून राहुल दामले यांनी अर्ज भरला होता. मात्र, दामले यांनी बुधवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे देवळेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. तर, उपमहापौरपदासाठी भाजपच्याच विशाल पावशे यांनी अर्ज मागे घेऊन विक्रम तरेंना प्राधान्य देऊ केले.

निवडणूक निकालात शिवसेना, भाजपला बहुमताने हुलकावणी दिल्याने सत्तास्थापनेसाठी मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण, मनसेच्या नगरसेवकांनी महापौरपदासाठीच्या निवडणुकीसाठी सभागृहात अनुपस्थित राहणे पसंत केले. या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या शिवसेनेला स्पष्ट बहुमताचा आकडा मात्र गाठता आला नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या दोन्ही पक्षात सत्तेचे गणित जमविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाही शिवसेना-भाजपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या दोन्ही पक्षांची युती झाली.