25 February 2021

News Flash

अंबरनाथमध्ये ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’

 गेल्या तीन वर्षांत लाखो रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला येत्या १ मार्चपासून सुरुवात होणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

व्यंगचित्रे, शिल्प प्रदर्शन, साहसी खेळ, संगीत मैफिलींचा नजराणा

अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील सांस्कृतिक चळवळींना महोत्सवाचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’चे चौथे पर्व येत्या १ ते ३ मार्चदरम्यान रंगणार आहे. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या सान्निध्यात रंगणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत कला सादर करणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या महोत्सवाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे.

गेल्या तीन वर्षांत लाखो रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला येत्या १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. अभिजात संगीतांच्या मैफलींबरोबरच जुन्या-नव्या कलावंतांचे चित्र, शिल्प आणि नृत्य सादरीकरण हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. अंबरनाथमध्ये ९७६ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले प्राचीन शिवमंदिर हे शिलाहारकालीन कलाश्रीमंत वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची ही या परिसरातील एकमेव खूण पुढील पिढय़ांसाठी जपून ठेवावी, या हेतूने गेल्या काही वर्षांपासून या भागात विविध विकास प्रकल्प तसेच सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. तसेच मंदिराच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव भरविण्याची सूचना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल सुरू केले होते. फेस्टिव्हलमुळे या प्राचीन वास्तुवैभवाला झळाळी प्राप्त झाली आहे. या फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

सांगीतिक, सांस्कृतिक मेजवानी

* महोत्सवात सतारवादक निलाद्री कुमार यांची कला रसिकांना अनुभवता येणार आहे. फ्युजन बँडही या वेळी जोडीला असेल.

* ख्यातनाम गायिका अलका याज्ञिक यांची स्वरमैफील शनिवार, २ मार्च रोजी रंगणार आहे.

* रविवार, ३ मार्च रोजी संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मराठमोळ्या शाल्मली खोलगडे यांच्या स्वरांचा अनुभव घेता येईल.

* तीन दिवसांच्या या फेस्टिव्हलमध्ये चित्रकला, व्यंगचित्र, लाइव्ह शिल्प साकारताना पाहता येणार आहे.

* चव महाराष्ट्राची हा पाच प्रांतांची खाद्यसंस्कृती दाखवणारे स्टॉलही येथे असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:54 am

Web Title: shiva mandir art festival in ambernath
Next Stories
1 गणेश नाईक ठाण्यातून लोकसभा लढवणार?
2 घोडबंदरच्या कोंडीची परीक्षार्थीना धास्ती
3 वाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
Just Now!
X