ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ शहर प्राचीन शिवमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. शिलाहार राजांनी साडेनऊशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले. हजार वर्षांपूर्वी या परिसरात नांदणाऱ्या कलासंपन्न लोकजीवनाची ही एक ठळक खूण मानली जाते. केंद्र शासनाचा आयुध निर्माण कारखाना, विम्को, धरमसी मोरारजी, के.टी. स्टील आदी कारखान्यांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक औद्योगिक शहर अशी अंबरनाथची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाण्यात घरांचे भाव गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीय बदलापूरच्या बरोबरीनेच अंबरनाथमध्ये राहण्याचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. अंबरनाथ हे एक टुमदार शहर आहे. विशेषत: पूर्वेकडे फिरताना त्याची जाणीव होते. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर पूर्वेकडे शिवधाम नावाची वसाहत आहे.

शिवधाम संकुल, अंबरनाथ, पूर्व

अतिथी गृह ते निवासी संकुल
अंदाजे ९ ते १० एकर जागेत १९९० च्या सुमारास शिवधाम संकुल उभारण्यात आले आहे. पूर्वी येथे माचिस बनविणाऱ्या विम्को या स्वीडिश कंपनीचे अतिथीगृह होते. ब्रिटिश अधिकारी येथे कामानिमित्त आले की या अतिथीगृहात राहात असत. झाडाझुडपांनी, फुलाफळांनी बहरलेली सुंदर निसर्गसंपदा येथे असल्याने अधिकारी येथे राहणे पसंत करीत. कालांतराने नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर अंबरनाथ शहराचा विकास होऊ लागला. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपले हातपाय येथे पसरण्यास सुरुवात केली. अशाच एका बांधकाम व्यवसाय कंपनीने ही जागा खरेदी करून या जागेवर हे भव्य असे निवासी संकुल उभारले आहे. या उंचसखल टेकडीवजा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जागेत १९९०-९५ च्या दरम्यान पाच मजल्याच्या १४ इमारती उभ्या राहिल्या. आठ सोसायटींमध्ये या इमारती विभागल्या गेल्या आहेत. वन, टू, थ्री बीचके असलेल्या या संकुलात एकूण ३२० सदनिका आहेत. येथे संमिश्र लोकवस्ती असून अधिकाधिक व्यापारी, व्यावसायिक राहतात. त्यात सोने-चांदी विक्रीचे व्यापारी अधिक असून त्यांची परिसरात व इतर अनेक ठिकाणी दुकाने आहेत, अशी माहिती येथील रहिवाशी शैलेश दोंदे यांनी दिली.

भक्तांसाठी मंदिर

संकुलात शिवभक्त मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे या इमारतींची नावेही महानंदी, त्रिनेत्र, निळकंठ, पार्वती, गौरी, त्रिशुल, कैलाश अशी आढळतात. येथेही शिवमंदिर आहे. पूर्वी ते छोटय़ा स्वरूपात होते, परंतु त्याचा जीर्णोद्धार करून ते आता प्रशस्त करण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांना येथे पूजाअर्चा, नामस्मरण, ध्यानधारणा भक्तिभावे करता येते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. अनेक धार्मिक सोहळे येथे पार पाडले जातात. एक छोटेसे श्री दत्त मंदिरही संकुलाच्या प्रवेशद्वारापाशी आहे. संकुलात प्रवेश करताच हे मंदिर दृष्टीस पडते आणि पुढे शिवमंदिराचे दर्शन होते. श्री दत्तमंदिरातही अनेक धार्मिक कार्यक्रम भक्तिभावे पार पाडले जातात.

संमिश्र वस्ती, संघटित वृत्ती

शिवधाम गृहसंकुलात सिंधी, मारवाडी, गुजराती, मराठी, ख्रिश्चन अशी संमिश्र लोकवस्ती आहे. १४ इमारतींच्या ८ सोसायटय़ा असून त्यांचा स्वतंत्र कारभार आहे. परंतु त्यावर देखरेख ठेवण्यासाठी फेडरेशन स्थापन करण्यात आली आहे. एस.के.चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली वसंत देढिया, एस.एम. गायकवाड तसेच बजाज, जयंतीलाल नागडा, राजन बिरामने, एन.बी.शेट्टी, अंबादास उबाळे, प्रकाश छेडा आदी अनेक पदाधिकारी, सदस्य सक्रीय असून संकुलातील वातावरण, सुखसमृद्ध, आनंदी राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी याच वसाहतीत राहतात. त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळात वसाहतीत अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या ते स्वीकृत नगरसेवक म्हणून येथे सक्रीय आहेत. शशिकला डोंगरे वसाहतीच्या विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. या वसाहतीचे वैशिष्टय़ म्हणजे वीज, पाणी बिल, महिना दुरुस्ती खर्च, तसेच नगरपालिकेचा कर याची कोणाचीही थकबाकी येथे आढळत नाही. नियमित कर आणि बिले भरणारे गृहसंकुल म्हणून शहरात ‘शिवधाम’ची ओळख आहे.

सुरक्षितता, सुविधा आणि गॅसपाइपलाइन गॅसविना

शिवधाम गृहसंकुलात क्लब हाऊस आहे. तसेच पोहण्याचे पूल, व्यायामशाळा, उद्यान, योग, नृत्याचे वर्ग आदी अनेक सुविधा आहेत. प्रत्येक इमारतींना लिफ्ट आहे. वाहनतळाचीही पुरेशी सुविधा आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्हीही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा रक्षकही २४ तास तैनात असतात. रेल्वे स्थानकाजवळच गजबजलेली बाजारपेठ आहे. हॉटेल, किराणा माल, सराफांची दुकाने, हॉटेल्स, रुग्णालय, वैद्यकीय दवाखाने, औषध, कपडे, फळे, भाजीपाला आदी अनेक दुकाने मोठय़ा प्रमाणात आहेत. संकुलाच्या बाहेरही अशीच अनेक दुकाने आहेत. घर जसे रेल्वेस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर तशी बाजारपेठ दोन मिनिटांच्या अंतरावर असल्याने येथील रहिवाशी समाधानी आहेत. पाणी मुबलक प्रमाणात येते. वसाहतीत पर्जन्य जल संधारण प्रकल्प आहे. नगरपालिकेकडून वेळच्यावेळी कचरा उचलला जातो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. परंतु पवनचक्कीमार्फत ऊर्जा निर्मिती करण्याचा मनोदय सुनील चौधरी यांनी व्यक्त केला आहे. नारळ, आंबा, बदाम, अशोक आदी फळापानांनी बहरलेली डोलेदार वृक्षसंपदा येथे असल्याने कडक उन आणि पावसापासून या इमारतींचे संरक्षण होते. वृक्षांची सावली आणि सुखद गारवा येथील रहिवाशांना उल्हासित करतो. वसाहतीपूर्वीपासून या संकुलात झाडे होती. त्यात आता १३४ झाडांची भर पडली आहे. त्यामुळे येथे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी घनदाट सावली नांदताना दिसते. उद्याने आणि खेळाचे मैदानही येथे आहे. वसाहतीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी, दहीहंडी, प्रजासत्ताक, स्वतंत्रदिन, दिवाळी, नाताळ, धार्मिक सोहळे आदी कार्यक्रम होत असतात. अंबरनाथ चित्रपट महोत्सवाची सांगताही याच मैदानात करण्यात आली होती. क्रिकेटचे सामनेही येथे होत असतात. फक्त खेदाची बाब म्हणजे येथे प्रत्येक रहिवाशांच्या घरात गॅसपाइपलाइन टाकण्यात आली आहे. परंतु गेले वर्षभरापासून ती तशीच आहे. परंतु गॅसपुरवठा अद्याप सुरू न झाल्याने येथील रहिवाशी मात्र नाराज आहेत. त्याबाबत विचारणा केल्यास त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे येथील रहिवाशी सांगतात. डीम्ड कन्व्हेयन्स अद्याप झाले नाही. त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सुनील चौधरी यांनी सांगितले.
सुहास धुरी suhas.dhuri@expressindia.com