09 July 2020

News Flash

आदित्य ठाकरेंच्या आगमनापूर्वी रस्ते सपाट

राज्यभर केलेल्या दौऱ्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवारी अंबरनाथ शहरात दाखल झाली.

पावसाचे कारण देणाऱ्या अंबरनाथ पालिकेची तत्परता

मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पाऊस थांबण्याचा हवाला देणाऱ्या पालिका प्रशासनाने शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी सर्व खड्डे बुधवारी तातडीने बुजवले. दोन महामार्गाना जोडणारा जोड रस्ता आणि फॉरेस्ट नाका भागात पडलेले हे खड्डे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरले होते. पावसाचे कारण पुढे करत स्थानिक प्रशासनही ते बुजवीत नव्हते. मात्र, जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे यांचा दौरा ठरताच ते बुजविण्यात आले.

राज्यभर केलेल्या दौऱ्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवारी अंबरनाथ शहरात दाखल झाली. अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका या भागातून ही यात्रा सुरू होऊन ती पुढे लादी नाका, विमको नाका, मटका चौक, हुतात्मा चौकमार्गे शिवाजी चौकातून पुढे उल्हासनगरला जाईल असे ठरले होते. अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांमधील नगरपालिकांमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. शिवाय उल्हासनगरातही शिवसेनेची भाजप खालोखाल ताकद आहे. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी केली होती. मात्र ज्या मार्गाने आदित्य ठाकरे अंबरनाथ शहरात प्रवेश करणार होते त्या मार्गावर प्रचंड खड्डे असल्याने शिवसैनिक गेल्या दोन दिवसांपासून चिंतेत होते. मंगळवार रात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू असल्याने खड्डे बुजविले जातील का प्रश्न अनुत्तरित होता. बुधवारी सकाळी पावसाने उसंत घेताच शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला. आपल्या नेत्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते सकाळपासूनच कामाला लागले.

काटई कर्जत महामार्गावरील टी पॉइंट ते कल्याण-बदलापूर रस्त्यावरील फॉरेस्ट नाका या जोड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बुधवार सकाळपासूनच युद्धपातळीवर हे खड्डे भरण्याचे काम पालिकेकडून केले जात होते. तसेच फॉरेस्ट नाका परिसरातील खड्डेही भरण्यात आले. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने का होईना पण शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:52 am

Web Title: shivsena aditya thakre entry akp 94
Next Stories
1 उपवन परिसराला अवकळा
2 दुरुस्तीसाठी रेल्वेफाटक बंद
3 कल्याण-शीळफाटा मार्गावर चार उड्डाणपूल
Just Now!
X