कल्याण पूर्वेतील तिसगाव संतोषनगर प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभागात रस्ते खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराकडे नगरसेवक महेश गायकवाड यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

नगरसेवक गायकवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपणास खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. गायकवाड नगरसेवक असलेल्या तिसगाव संतोषनगर प्रभागात एका खासगी कंपनीकडून केबल वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराकडून रस्ते खोदले जात आहेत. प्रभागातील रस्ते सुस्थितीत आहेत. हे काम पालिकेची परवानगी घेऊन सुरू आहे का तसेच स्थानिक नगरसेवकाला यासंबंधी विचारणा केली का, असे प्रश्न करीत नगरसेवक गायकवाड यांच्या समर्थकांनी घटनास्थळी येऊन ठेकेदाराच्या कामगारांना मारहाण केली आणि एक लाख रुपये खंडणीची मागणी केली, अशी तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ठेकेदाराने दाखल केली. ठेकेदाराकडे खंडणी मागण्याचा प्रकार गैर आहे. गुन्हेगार काहीही बोलत आहे, असे प्रत्युत्तर आमदार गणपत गायकवाड यांनी नगरसेवक गायकवाड यांच्या उत्तरावर दिले आहे. महेश गायकवाड यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी नगरसेवक गायकवाड यांच्याशी  होऊ शकला नाही.