आगरी सेनेच्या एका गटाचा विरोध

माजी चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारीमुळे आगरी सेनेत मात्र फूट पडली आहे. आगरी सेनेच्या एका गटाने शर्मा यांना पाठिंबा दिला आहे तर दुसर्म्या गटाने विरोध केला आहे. स्थानिक उमेदवार नसेल तर आगरी सेना आपला उमेदवार उभा करेल असे या गटाने जाहीर केले आहे.

वसई-विरार शहरात आगरी सेनेचे प्राबल्य असून त्यांनी युतीला साथ दिली आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत झाला होता. नालासोपारा हा भाजपाचा बालेकिल्ला असला तरी शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू  आहे. त्यावरून आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलाश पाटील यांच्यात वाद उफाळून आला आहे.  पाटील यांनी शर्मा यांना पाठिंबा दिल्यानंतर  कैलास पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. नालासोपाऱ्यात बाहेरील उमेदवाराला आगरी सेना पाठिंबा देणार नाही. स्थानिक उमेदवार नाही दिला तर आगरी सेना आपला उमेदवार उभा करेल असे कैलाश पाटील यांनी जाहीर केले आहे.