|| आशीष धनगर- सागर नरेकर

सणासुदीमुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची मागणी

ठाणे/ उल्हासनगर : राज्य सरकारने टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल, मद्यालये आणि उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र,  इतर दुकाने आणि आस्थापनांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे बंधनकारक केल्याने   जिल्ह्यातील व्यापारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही दिवसांत सण-उत्सवांचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.

शहरातील जांभळी नाका आणि ठाणे स्थानक परिसरात शेकडो अन्न-धान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आहेत.  सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर अनेक ग्राहकांची सायंकाळी ६ वाजेपासून येथे खरेदीसाठी दाखल होतात. दुकाने बंद करण्यासाठी अवघा एक तासाचा वेळ शिल्लक असल्यामुळे खरेदीसाठी गर्दी होते. त्यामुळे अंतरनियमांचाही फज्जा उडतो. अनेकदा सायंकाळी कामावरून सुटल्यावर लोक रात्री ७ वाजेनंतर कुटुंबासोबत खरेदीकरिता येत असतात. मात्र, वेळेच्या मर्यादेमुळे सध्या दुकाने लवकरच बंद करावी लागत असून सायंकाळी ७ वाजेच्या नंतर येणाऱ्या ग्राहकांना मुकावे लागते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याची प्रतिक्रिया ठाण्यातील व्यापारी संजू शहा यांनी दिली. सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करावी लागत असल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया दिवा मर्चंट सेवा संस्थेच्या ज्योती पाटील यांनी दिली.

उल्हासनगरातील व्यापाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

उल्हासनगर शहर हे एक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. घाऊक आणि किरकोळ विक्रीच्या अनेक बाजारपेठा शहरात आहेत. येत्या काही दिवसांवर सण-उत्सव येऊन ठेपले आहेत. असे असताना ग्राहकांची गर्दी आणि वेळेची मर्यादा ही काही तासांनी वाढवावी, अशी मागणी उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक चतलानी यांनी व्यापाऱ्यांनाही दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत लवकरत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. याबाबत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.