घरपोच देण्यासाठी दोन हजारांचा किराणा घेण्याची सक्ती

डोंबिवली : रहिवाशांनी रस्त्यावर किराणा सामान खरेदीसाठी गर्दी करू नये यासाठी महापालिकेने कल्याण, डोंबिवली शहरातील एक हजाराहून अधिक दुकानदारांमार्फत घरपोच किराणा सामान उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी महापालिकेमार्फत सुचविण्यात आलेल्या दुकानदारांकडूनच ग्राहकांची अडवणूक सुरू असल्याचे चित्र आहे. या दुकानदारांना ग्राहकांनी किराणासाठी संपर्क केला असता किमान दोन हजार रुपयांचे सामान घेणार असाल तरच घरपोच सुविधा मिळेल, अशी अट टाकली जात आहे.

कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांतून रहिवासी अशा अडवणूक करणाऱ्या दुकानदारांच्या तक्रारी करत आहेत. पाच ते एक हजार रुपयांचे सामान खरेदी करायचे असेल तर दुकानात या आणि सामान घेऊन जा, असा सल्लाही काही दुकानदार देत आहेत. प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घरपोच सेवा देणारे दुकानदार काम करत आहेत. दुकानदारांना घरपोच सेवा देण्यासाठी मजूर नसतील तर पालिका प्रभाग अधिकाऱ्याने आपले कामगार त्या कामासाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत, असे आयुक्तांचे आदेश आहेत. प्रत्यक्षात या आघाडीवरही अनेक तक्रारी पुढे येत आहेत. डोंबिवलीतील सारस्वत वसाहतीमधील रहिवासी दुर्गेश कामत यांनी सांगितले, आपण आपल्या परिसरातील किराणा दुकानदाराला घरपोच सामानासाठी संपर्क केला. त्याने तुम्ही दोन हजार आणि त्यापुढे खरेदी करणार असाल तर तुम्हाला घरपोच सामान पोहोचवितो, अन्यथा सामान दिले जाणार नाही, असे सांगितले. आपण विनंती करूनही दुकानदार ऐकत नव्हता, असे कामत यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेच्या परवान्यासाठी फेऱ्या

कल्याणमधील झोजवाला व्यापारी संकुलाजवळील महाजनवाडीतील एका किराणा दुकानदार ग्राहकांना घरपोच किराणा सामान देण्यास तयार आहे. या सेवेसाठी पालिकेच्या ‘क’ प्रभागाकडून दुकानदारांना अत्यावश्यक सेवेचा पास दिला जातो. हा पास घेण्यासाठी महाजनवाडीतील स्वस्तिक किराणा दुकानाचा मालक मागील तीन दिवस ‘क’ प्रभाग अधिकारी खुताडे यांच्याकडे दिवसभर फेऱ्या मारत आहे. तीन ते चार तास बसूनही आपणास पास देण्यात येत नसल्याचे या दुकानदाराने सांगितले.

ग्राहकाने १०० रुपयांचे किराणा सामान घरपोच मागितले तरी किराणा दुकानदाराने तात्काळ किंवा दुकानदाराच्या वेळेप्रमाणे ते ग्राहकाच्या घरपोच पोहोचविले पाहिजे. अमुक किमतीचे सामान घेतले तरच सामान पोहोचवू, अशी अडवणूक करणाऱ्या दुकानदारांना समज देण्यात आली आहे. जे दुकानदार सामानाच्या किमतीवरून घरपोच देण्यास अडवणूक करीत राहिले तर ग्राहकांनी थेट आपल्याकडे तक्रारी कराव्यात. या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

– राजेश सावंत, प्रभाग अधिकारी, ‘फ’ प्रभाग