बायोमेट्रीक यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी; सामन्यांची परवड

शिधावाटप दुकानांमधून धान्याचे वाटप करताना ग्राहकांचे बायोमेट्रिक ठसे बंधनकारक करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे असून यामुळे ग्राहकांचा रोष वाढल्याचा दावा केला जात आहे. ही यंत्रणा दोषमुक्त केली जावी आणि त्यानंतरच अशा स्वरूपाची सक्ती करावी या मागणीसाठी बुधवारपासून ठाणे जिल्ह्य़ातील १४०० रेशन दुकानदारांनी बेमुदत संपाचे हत्यार उगारले. ठाणे जिल्ह्य़ातील रेशनिंग दुकानदार कृती समितीने संपाची हाक दिली आहे.

या बंदमध्ये जिल्ह्य़ातील सर्वच दुकानदार सहभागी झाल्याचा दावा रेशनिंग दुकानदार संघटनेकडून करण्यात येत असला तरी ९० टक्के दुकाने बंद असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच शिधावाटपसाठी देण्यात आलेली ई-पॉस यंत्र एकत्रित जमा करून ती गुरुवारी रेशनिंग विभागाला परत देण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

शिधावाटपासाठी बायोमेट्रिकची सक्ती करत शिधापत्रिका आधारकार्डशी संलग्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच शिधावाटपासाठी रेशनिंग दुकानदारांना ई-पॉस यंत्रही देण्यात आली आहेत. मात्र, या बायोमेट्रिक प्रणालीमध्ये अनेक नागरिकांच्या अंगठय़ाचे ठसे जुळत नसल्याने धान्य वाटपात अडचणी निर्माण होत आहेत, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. अंगठय़ाचे ठसे जुळत नसलेल्या व्यक्तीला धान्य दिले जात नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे दुकानदार आणि नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला आहे.

दरम्यान, सरकारच्या या धोरणाचा निषेध करत ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार कृती समितीने बुधवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, मीरा-भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या भागांत १४७३ रेशनिंग दुकानदार आहेत. हे सर्वच दुकानदार बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा समितीकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र ९० टक्के दुकानदार बंदमध्ये सहभागी झाल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत ठाण्याचे शिधावाटप विभागाने उपनियंत्रक अधिकारी नरेश वंजारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सदोष यंत्रणेमुळे समस्या

बायोमेट्रिक प्रणालीमध्ये अनेक नागरिकांच्या अंगठय़ाचे ठसे जुळत नसल्याने त्यांना धान्य वाटप केले जात नसून यातूनच नागरिक आणि दुकानदारांमध्ये वाद होऊ लागले आहेत. असे असताना याच कारणावरून भिवंडीतील श्री कृष्णा ग्रेन स्टोअर्सच्या दुकानदाराला एका नागरिकांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. तसेच कळवा आणि भिवंडीमध्ये दोन रेशनिंगची दुकाने फोडण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नागरिक धान्यापासून वंचित

अनेक नागरिकांची कागदपत्रे घेऊन ती शासनाकडे सादर केल्यानंतरही चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या चुकीच्या नोंदीमुळे नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते आहे. त्यामुळे ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांना बायोमेट्रिक सक्ती करण्यात येऊ नये, असे दुकानदारांकडून सांगण्यात आले. तसेच याबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.