नियमावली जाहीर होऊनही दुकाने, बाजारपेठा सुरू; पोलिसांच्या सूचनेनंतर व्यापारी वर्गातून विरोध

ठाणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांचीच मोडतोड झाल्याचे अंशत: टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. या आदेशांची कल्पना नसल्याचे सांगत मंगळवारी सकाळी जिल्ह्यतील सर्वच शहरांतील व्यापाऱ्यांनी दुकाने व बाजारपेठा खुल्या केल्या. मात्र पोलिसांनी नियमावली दाखवून दुकाने बंद करण्यास सुरुवात करताच अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांतून विरोधाचा सूर उमटला. या संघर्षांमुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला होता. नव्या नियमावलीअंतर्गत घालण्यात आलेल्या वाहतूक निर्बंधांचीही सर्रास पायमल्ली झाल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवे आदेश लागू केले आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच खासगी बसगाडय़ा आणि रेल्वेमध्ये आसन क्षमतेने आणि रिक्षामध्ये दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र पहिल्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी या आदेशाचे अनेक नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी उल्लंघन केल्याचे चित्र दिसून आले. नव्या नियमावलीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असले तरी, याबाबत अनेक ठिकाणी व्यापारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यातूनच मंगळवारी सकाळी ठिकठिकाणी नित्य व्यवहार सुरू होते. घोडबंदर, मानपाडा, मनोरमानगर, वर्तकनगर, वागळे इस्टेट, नौपाडा भागात कपडे, भांडी तसेच इतर वस्तू विक्रीची दुकाने सुरू होती.  सकाळी १० वाजेनंतर पोलिसांची पथके शहरात फिरू लागली आणि त्यांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. त्यास व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ मात्र सकाळपासून कडकडीत बंद होती. काही दुकाने सकाळी सुरू करण्यात आली होती. मात्र तीही थोडय़ा वेळात बंद करण्यात आली. शहराच्या अंतर्गत भागांत मात्र, अर्धवट उघडय़ा दुकानांत छुप्या पद्धतीने व्यवहार सुरू होते.

कल्याण शहरात पुस्तक, इलेक्ट्रॉनिक, स्टेशनरीची दुकाने सकाळी सुरू होती. मात्र दुपारी १२ वाजता पोलीस आणि महापालिका  पथकाने मुख्य रस्त्यांवर फिरून जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंद करण्याची उद्घोषणा सुरू केली. त्यानंतर मुख्य रस्त्याकडेला असलेली दुकाने बंद झाली. तर डोंबिवलीतील आयरे रोड, आजदे, गांधीनगर, उमेशनगर, गरिबाचा वाडा, नवा पाडा, देवीचा पाडा, मोठा गाव, रेतीबंदर, कोपर आणि कल्याणमधील कातेमानीवली, कोळसेवाडी, चिंचपाडा, गंधारे, बारावे, आधारवाडी, रेतीबंदर मोहने, आंबिवली या भागांतील अंतर्गत रस्त्यांकडेला असलेली दुकाने सुरू होती. भाजी बाजारामध्ये पोलीस अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी तैनात होते. त्यामुळे भाजी बाजारात तुरळक गर्दी होती.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरातील व्यापाऱ्यांनीही मंगळवारी सकाळी दुकाने सुरू  केली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र त्याबद्दल व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतर दुकाने बंद असताना भाजीपाला, बँका तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबाहेर अंतर नियमांचे पालन न करता गर्दी होत असल्याचे दिसून आले. बदलापूरच्या बाजारपेठेत असलेली अत्यंत दाटीवाटीची भाजी मंडई नेहमीप्रमाणे ग्राहकांनी भरली होती. तर स्थानक परिसरातही नेहमीसारखीच वर्दळ पहायला मिळत होती. त्यामुळे टाळेबंदीचे सर्व नियम केवळ दुकानादारांनाच का, असा प्रश्न व्यापारी संघटनेनेने उपस्थित केला आहे.

केशकर्तनालये व्यावसायिकांचे आंदोलन

नव्या आदेशानुसार केशकर्तनालये बंद राहणार आहेत. त्यामुळे केशकर्तनालये चालकांसोबतच त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांनी राज्य शासनाच्या नव्या आदेशाविरोधात वागळे इस्टेट परिसरात मंगळवारी सकाळी आंदोलन केले. आमचे राज्य सरकारच्या शनिवार आणि रविवारच्या टाळेबंदीला पूर्ण सहकार्य असेल, पण इतर दिवशी आमची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा द्या, अशी मागणी संतसेना पुरोगामी नाभिक संघाचे उपसचिव संतोष राऊत यांनी केली आहे.

भाजपचा व्यापाऱ्यांना पाठिंबा

नौपाडा परिसरात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आमदार डावखरे, केळकर आणि भाजपच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, धनेश राठोड यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी शहरात किराणासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने दररोज किमान चार तास सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. व्यापारी आणि छोटय़ा दुकानदारांसह कर्मचाऱ्यांना नव्या संकटात ढकलू नये, अशी विनंती त्यांनी केली.

वाहतूक नियमांचीही ऐशीतैशी

ठाण्यातील वर्तकनगर भागात काही रिक्षाचालकांकडून तीन प्रवाशांची वाहतूक सुरू होती. पोलीस दिसताच चालकाच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाला उतरवले जात होते. त्यानंतर रिक्षा पुढे काही अंतरावर नेऊन प्रवाशांना पुन्हा बसविले जात होते. कल्याणमध्ये रिक्षा थांब्यावर पोलीस कर्मचारी उभे असल्याने या ठिकाणी नियमांचे पालन केले जात होते. दरम्यान, खासगी बसगाडय़ा आणि रिक्षाचालकांवर कठोर कारवाई सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. रेल्वे स्थानकांमध्येही मंगळवारी नागरिकांची गर्दी झाली होती. कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतून येणाऱ्या रेल्वेगाडय़ा पूर्ण भरलेल्या होत्या.

व्यापाऱ्यांचे आंदोलन

ठाणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांना विरोध करत ठाणे जिल्ह्यत ठिकठिकाणी व्यापारीवर्ग मंगळवारी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी उघडलेली दुकाने पोलिसांनी बंद करण्यास सुरुवात केल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  राम मारुती रोड आणि गोखले रोड परिसरात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन राज्य सरकारचा निषेध केला. तसेच दुकानांसमोर व्यापाऱ्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी १० व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वीच्या टाळेबंदीमुळे आधीच व्यापारी संकटात सापडला आहे. त्यात आता पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. दुकानांमध्ये

नियमांचे पालन करून व्यवसाय करीत होतो. दुकाने बंद ठेवली तर, कामगारांचे वेतन कसे द्यायचे, असे राम मारुती रोड रिटेलर्स असोसिएशनचे सदस्य कौशिक केडिया यांनी सांगितले. तर टाळेबंदीचा आमच्या ४५ व्यापारी संघटनांकडून निषेध नोंदविण्यात येत आहे. आम्ही नियमांचे पालन करून व्यवसाय करत होतो. त्यामुळे सरकारने आमचा विचार करून दुकाने सुरू ठेवण्यास मुभा द्यावी. या मागणीसंदर्भात लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे ठाणे व्यापार उद्योग महासंघाचे अध्यक्ष भावेश मारू यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली भागांतही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला.  मात्र व्यापारी रस्त्यावर उतरले नाहीत.