मॉल व्यवस्थापनांची खबरदारी; पूर्वनोंदणी आवश्यक

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणू संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे जीवनमान बदलले आहे. या बदललेल्या जीवनमानाप्रमाणे आता ठाण्यातील काही व्यापाऱ्यांनीही त्यांच्या व्यवसायाच्या पद्धती बदल्या आहेत. टाळेबंदीनंतर नागरिकांना खरेदीसाठी आता या नव्या पद्धतीचा उपयोग करावा लागणार असून या नव्या पद्धतीमध्ये खरेदीसाठी पूर्वनोंदणी करणे, खरेदी दरम्यान अंतर राखणे, मोबाइलमध्ये सेतू अ‍ॅप्लिकेशन बाळगणे आणि ग्राहकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अशा पद्धतीच्या नव्या नियमांची अंमलबजावणी आता ठाण्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मार्च महिन्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता राज्यातील इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. ‘मिशन बिगेन’अंतर्गत काही व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ठाणे शहरातील मुख्य असलेला विवियाना मॉल सुरू करण्याच्या पूर्व तयारीला लागले असून टाळेबंदीनंतर मॉलची रूपरेषा कशी असेल यासंदर्भात चित्रफीतद्वारे समाजमाध्यमांवर जाहिरात करत असल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदीनंतर विवियाना मॉल सुरू झाल्यास नागरिकांचे तापमान आणि नाडी तपासून तसेच त्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशनचा समावेश आहे का हे पाहूनच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी संपूर्ण मॉलमध्ये वर्तुळ आखण्यात आली आहेत. मॉलच्या खाद्य विभागातही अंतर राखण्यासाठी ५० टक्के बाकडे कमी करण्यात आले असून आता नागरिकांना रांग लावण्याची अवश्यकता नाही. ऑनलाइन अ‍ॅपच्या सहाय्याने ऑर्डर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती विवियाना मॉलच्या जनसंपर्क समूहातील रमेश उप्पारा यांनी दिली आहे.

ठाण्यातील कोरम मॉल प्रशासनानेही मॉल उघडण्यापूर्वी करोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मॉलमध्ये सर्वत्र अंतरसोवळ्याचे नियम पाळण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत. मॉलमध्ये येण्यासाठी ग्राहकांना पूर्वनोंदणी करण्यासाठीची व्यवस्था तयार करण्यात आली असून मॉल प्रशासन सर्व सूचनांचे पालन करत असल्याचे मॉल व्यवस्थापनाने सांगितले.

टाळेबंदीनंतर पूर्वनोंदणी आवश्यक

ठाणे शहरात टाळेबंदीनंतर इतर दुकाने सुरू करण्यास शासनाकडून परवानगी मिळाल्यास कशा पद्धतीने सर्व नियमांचे पालन करून दुकान सुरू करता येतील या संदर्भात शहरातील काही कपडे आणि पार्लर/ सलुन व्यावसायिकांनी पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी आता समाजमाध्यमांवर जाहिरातीही देत आहेत. ठाण्यातील कलामंदिर या साडय़ांच्या दुकानात खरेदीला जाण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच एका वेळेस केवळ तीन ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जाणार आहे. तर पार्लर आणि सलुनमध्ये जाण्यासाठीही पूर्वनोंदणी अवश्यक असून ग्राहकांना येण्याची वेळ ठरवून देण्यात येत आहे.