कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापना शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आज, शनिवारपासून होणार आहे. या निर्णयावर व्यापाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कल्याण-डोंबिवलीत दररोज सरासरी ८०० ते ९०० करोना रुग्ण आढळत असल्याने आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले. त्यानुसार सर्व दुकाने, आस्थापना दर शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, वर्तमानपत्रे, औषध दुकाने, रुग्णालये, गॅस पुरवठा, उद्वाहन दुरुस्ती, किराणा, पेट्रोल पंप अशा सेवांना निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. पालिका हद्दीतील फेरीवाले आणि हातगाडी चालकांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने चालविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उपाहारगृहे, मद्यालये, पोळी-भाजी केंद्रे यांना घरपोच सेवेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्बंधांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात होणारी दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ते पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी आज, शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. आस्थापना सुरू राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी प्रभाग अधिकाºयांना दिल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाली दुकाने, आस्थापनांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वर्षभरानंतर व्यवसायाचा गाडा रुळावर येत असताना पुन्हा कठोर निर्बंधाचे पाऊल प्रशासनाने उचलल्याने व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शनिवार, रविवार हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे दिवस असतात. त्याच दिवशी दुकाने बंद राहणार असल्याने व्यापारी धास्तावले आहेत. दहा दिवसांपूर्वी शहरात दुकानांच्या वेळा सकाळी १० ते रात्री आठ करण्यात आल्या आहेत.

रुग्णनोंद…

* देशात ५९,११८

* राज्यात ३६,९०२

* मुंबईत ५,५१३

* ठाण्यात ३,२१८

राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी

राज्यात करोना प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर के ला. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मॉल्स रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.