ठाण्यात १५ ऑगस्टपासून सातही दिवस दुकाने सुरू होणार; मॉल, वाणिज्य संकुल, व्यायामशाळा आणि तरण तलावांवर निर्बंध कायम

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागल्याने येत्या १५ ऑगस्टपासून आठवडय़ाचे सातही दिवस दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी महापालिकेने घेतला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोतर्ब करण्यात आले. दरम्यान, शहरातील मॉल, वाणिज्य संकुले, व्यायामशाळा आणि तरण तलावांबाबत आढावा घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सिनेमागृहे अजून काही काळ बंद असणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यात टाळेबंदी शिथिलीकरणानंतर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी २ ते १९ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली होती. त्यानंतर सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. आधीचे चार महिने टाळेबंदीमुळे दुकाने बंद होती. नव्या नियमामुळे महिन्यातून पंधरा दिवस व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र होते. ऑगस्ट महिन्यापासून सण-उत्सवांचा काळ सुरू होत असल्यामुळे नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत होती. त्यामुळे ही गर्दी टाळून करोनाचा धोका कमी करण्यासाठी आठवडय़ातील सातही दिवस सर्वच दुकाने सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त आणि शहरातील सर्वच आमदारांची भेट घेतली होती. मुंबईत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असताना ठाण्यात मात्र हा निर्णय प्रलंबित होता. त्यामुळे व्यापारी वर्गात अस्वस्थता होती. असे असतानाच पालकमंत्री शिंदे यांनी गुरुवारी ही मागणी मान्य करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे. शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत  झालेल्या

बैठकीत हा निर्णय घेतला असून या बैठकीला महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांना सूचना

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सम – विषम पद्धतीने ज्या आस्थापना सुरू होत्या, त्या येत्या १५ ऑगस्टपासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत. तसेच मॉल, वाणिज्य संकुल, व्यायामशाळा आणि तरण तलावांबाबत आढावा घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे आदेश पालकमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच मुखपट्टी लावणे, योग्य अंतर राखणे, दुकानामध्ये काम करणाऱ्या सर्वाची चाचणी करावी. तसेच राज्य शासनानासह महापालिका प्रशासनाने ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत ,त्यांचे पालन होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापाऱ्यांची असेल अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.