येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील सेवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीची काच फोडून गाडीतील लॅपटॉपची चोरी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. रुग्णालयात तसेच लगतच असलेल्या व्हिव्हिआना मॉलमध्ये येणारे बरेचसे ग्राहक याच सेवा रस्त्याच्या कडेला वाहन उभे करतात. वाशी येथे राहणाऱ्या जगदीप गुरुबक्षसिंग सेठी (४३) यांनी बुधवारी त्यांची गाडी उभी केली होती. तेव्हा अज्ञात चोरटय़ाने सेठी यांच्या गाडीच्या मागील दरवाजाची काच तोडून गाडीतील ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भिवंडीत शस्त्रे जप्त
भिवंडी : येथील मूलचंद कंपाउंड परिसरात शहर पोलिसानी गुरुवारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, १  जिवंत काडतूस, लोखंडी चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. भिवंडी येथे राहणाऱ्या मोहम्मद अली ऊर्फ बब्बल अस्लम शेख (२३), सोहेल कलाम अन्सारी (२३), वसीम अन्सारी या आरोपींकडून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकलच्या धडकेत एक ठार, एक जखमी
ठाणे : मानपाडा येथे रस्ता ओलांडताना भरधाव मोटारसायकलची धडक लागून गुरुवारी झालेल्या अपघातात दोस्ती एम्पारीया इमारतीत राहणाऱ्या सिद्धिकी अजिज सरदार यांचा मृत्यू झाला तर जीवन शेख हा पादचारी जखमी झाला. घोडबंदर मार्गावर ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने मानपाडा उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी दोस्ती एम्पारीयासमोर सरदार आणि शेख या दोन पादचाऱ्यांना उडवले. अपघातानंतर घटनास्थळावरून मोटारसायकलस्वार पळून गेला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सैनु बाबा वीरकर (४६) यांनी केलेल्या तक्रारीनुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओवळा भागात घरफोडी
ठाणे : येथील ओवळा परिसरातील वैष्णवी भवन इमारतीत राहणाऱ्या विलास मोरेश्वर म्हात्रे (३१) यांच्या घरी गुरुवारी घरफोडी झाली. चोरटय़ांनी म्हात्रे यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंयडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि कपाटातील एक लाख ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उघडय़ा दरवाजाची ‘किंमत’ ८२ हजार रु.
भिंवडी : डॉक्टरकडे जाताना घाईगडबडीत दरवाजा उघडा राहिल्याने चोरटय़ाने घरात प्रवेश करून चोरी केल्याची घटना गुरुवारी भिवंडी येथील कोनगाव परिसरात घडली. परेश माधव सोनावणे (३३) त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत डॉक्टरकडे कल्याण येथे जात असताना घाईगडबडीत घराचा दरवाजा उघडा राहिला. या दरवाजातून सोनावणे यांच्या घरात प्रवेश करून चोरटय़ाने एक लॅपटॉप, दोन मोबाईल फोन असा ८२ हजार रुपये किमतीचा माल चोरला. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.