ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सोनसाखळी चोऱ्या रोखण्यात पोलीसांना अपयश येत असल्याचे रविवारच्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटनांवरुन समोर येत आहे. कोलबाड रोड परिसरात राहणाऱ्या शालन मनोहर पराडकर (७०) या तलावपाळी येथील वसंत हॉटेल जवळ रिक्षा पकडण्यासाठी जात होत्या. तेव्हा मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पराडकर यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र आणि २० हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ खेचली आणि चिंतामणी ज्वेलर्सच्या दिशेने चोर मोटारसायकलवरुन निघून गेले. दुसऱ्या एका घटनेत कळवा येथील पारसिकनगर भागात राहणाऱ्या अनुपमा उर्फ अनुजा मोहन पाटील (४४) घराजवळील चिनार सोसायटीत पूजेला जात होत्या. तेव्हा येथील वास्तुआनंद इमारती जवळ मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरटय़ांनी पाटील यांच्या गळ्यातील एक लाख १२ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र आणि २८ हजार रुपये किंमतीचे दुसरे मंगळसुत्र चोरटय़ाने खेचले. या गुन्ह्य़ाप्रकरणी अनुक्रमे नौपाडा आणि कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळव्यात रिक्षाचोरी
कळवा : ठाण्यात आता रिक्षा चोरीचे प्रकारही वाढू लागले आहेत. कळवा येथील म्हात्रे वाडा परिसरात राहणारे मुराद अली अब्दुल करीम शेख (३५) यांनी धनंजय लक्ष्मण कजवजे यांच्याकडून ५ वर्षांकरीता परमिट भाडय़ाने घेतलेली रिक्षा अज्ञात चोरटय़ाने रविवारी शेख यांच्या घरासमोरू न चोरली. शेख यांच्या घरासमोर अनिल शिंदे या त्यांच्या रिक्षावरील चालकाने रिक्षा उभी केली होती. तिची किंमत ८० हजार रुपये होती.

कल्याणमध्ये मोटारसायकल जाळपोळ
कल्याण : गेल्या अनेक दिवसापासून कल्याण येथील काळा तलाव परिसरात सुरु असणाऱ्या गाडय़ा जाळपोळीची मालिका रोखण्यात पोलीसांना अपयश येत आहे. कल्याणात दोन रिक्षा आणि स्कूटर जाळल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच काळा तलाव येथे अशोक शिवराम पाटील (६०) यांची मोटारसायकल रविवारी अज्ञात व्यक्तींनी जाळली. यात मोटारसायकलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्तकनगरमध्ये  घरफोडी
ठाणे : वर्तकनगर परिसरातील बिल्डिंग क्रमांक ४६ मध्ये राहणाऱ्या जेफ्री रिचर्ड रसल (४८) यांच्या घरी शनिवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी चोरी केली आणि लाखोंचा ऐवज लंपास केला. रसल यांच्या बंद घराचा कोयंडा चोरटय़ांनी उचकटून घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोख, चांदीचे दागिने, महागडे गॉगल तसेच घडय़ाळ आणि कपडे असा एकूण एक लाख २१ हजार रुपये किंमतीचा माल चोरटय़ांनी चोरुन नेला. या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंवडीत तरुणाकडून पत्नीची हत्या
भिंवडी : पतीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी भिंवडीत घडली. आरोपी अली हसन उर्फ सोनू महमंद शफी शेख (२७) याने त्याची पत्नी रुबिना बानू अली हसन सोनू शेख (२४) हिने तिच्या बहिणीकडून ५ हजार रुपये आणले नाहीत तसेच पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला.
याप्रकरणी पोलीसानीं शेख याला अटक केली असून त्याच्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.