स्वप्ननगरी, मायानगरी अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या आकर्षणाने असंख्य चिमुरडी मुले मुंबापुरीत दाखल होतात. पण अल्पावधीतच येथील रस्त्यांवरून भटकता भटकता त्यांच्या मनातील मुंबईचे स्वप्नाळू चित्र कोलमडून पडते आणि वास्तवाचे भान येऊ लागते. तरीही शहरातील झगमगाटाची ओढ त्यांना घरी परतू देत नाही. अशी मुले नकळत व्यसन, गुन्हेगारीकडे ओढली जातात. अशा मुलांचे भावविश्व ‘बाजीराव’ या लघुपटातून पडद्यावर उभे राहते. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील अनुराग जाधव याची निर्मिती असलेला हा लघुपट अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत समीक्षक आणि रसिकांची पसंती मिळवत आहे.
घडय़ाळ्याच्या काटय़ावर जीवन जगणाऱ्या मुंबईकरांचे रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या या अनाथ मुलांकडे लक्ष नसते, पण रेल्वे स्थानकात राहूनही ही मुले स्वप्न पाहणे सोडत नाहीत. स्वप्न पाहून पूर्णत्वास नेण्यासाठी ही मुले कठीण परिस्थितीतही झगडत असतात. हीच झुंज अनुरागने ‘बाजीराव’मधून मांडली आहे. रेल्वे स्थानकावर राहणाऱ्या या मुलांकडे पाहण्याचा पांढरपेशा समाजाचा दृष्टिकोन अनेकदा पूर्वग्रहदूषित असतो. खरे तर सगळीच मुले काही वाईट वळणाची नसतात. नकळत व्यसनांच्या आहारी जात असतात. या मुलांना थोडे प्रेम दिले, त्यांच्यावर विश्वास टाकला तर एक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होऊ शकते, हा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
या लघुपटाची निर्मिती करताना अनुरागने अनाथ आश्रमात राहणाऱ्या तसेच रेल्वे स्थानकातील या अनाथ मुलांच्या वर्तनाचा बारकाईने अभ्यास केला. अहमदनगर येथे तसेच पुण्यात झालेल्या सम्यक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘बाजीराव’ या लघुपटाला गौरवण्यात आले आहे. प्रा. महेश पाटील, शशांक विभुते, कैलास मठदेवरू यांच्या सहकार्याने अनुराग जाधव आणि त्याच्या मित्रांनी स्वत: पैसे गोळा करून या लघुपटाची निर्मिती केली आहे.