27 May 2020

News Flash

मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांचा तुटवडा

वितरकांच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे औषधालयांची कोंडी

संग्रहित छायाचित्र

वितरकांच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे औषधालयांची कोंडी

अंबरनाथ : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच राहील, असे सातत्याने राज्य शासनाकडून सांगितले जात असले तरी आता औषध वितरकांच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना औषधांच्या तुटवडय़ाला सामोरे जावे लागले आहे. औषधालयांना पुरवठा करणारे वितरक आधी पैसे मगच औषधे अशी भूमिका घेत असल्याने औषधालयांची कोंडी झाली आहे. त्याचा थेट फटका मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना बसत आहे.

सध्याच्या घडीला अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ शहर आणि बदलापूर तसेच वांगणी आणि इतर ग्रामीण भागात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक रुग्ण चिंतेत आले आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता या औषधांचा पुरवठा योग्यरीत्या होत नसल्याबाबत औषध विक्रेते दुकानदार सांगत आहेत. औषधांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना अधिकच्या तपासणीला सामोरे जावे लागत आहेत. त्यातही अनेक औषध वितरक मोठय़ा वाहनांतून नाही तर रिक्षा आणि खासगी वाहनातून औषधांचे वितरण करतात. मात्र टाळेबंदीच्या काळात अनेक रिक्षाचालक गुन्हे टाळण्यासाठी सेवा देण्यास नकार देत असल्याने वितरकांची कोंडी झाली आहे. तर स्वत:ची यंत्रणा आणि वाहन असणाऱ्या अनेक वितरक आडमुठी भूमिका घेऊन औषध विक्रेत्यांकडे वस्तू देत असतानाच पैशांची मागणी करत आहेत. आगाऊ  पैसे दिल्याशिवाय औषधे दिली जाणार नाही, अशी भूमिका अनेक वितरकांनी घेतल्याचेही दिसून आले आहे. यापूर्वी औषधांचा पुरवठा करून काही दिवसांचा वेळ पैसे देण्यासाठी दिला जात होता. मात्र आता तो वेळ दिला जात नसल्याने आमची अडचण होत असल्याचे अनेक औषध विक्रेते नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत. त्यामुळे रुग्णांचा आणि त्यातही मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या वयोवृद्ध रुग्णांचा विचार करून सेवेत सहकार्य करण्याची मागणी औषध विक्रेत्यांकडून होते आहे. याबाबत अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांना विचारले असता, याची माहिती मिळताच अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढला असून त्यानंतरही वितरकांनी सहकार्य न केल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:30 am

Web Title: shortage of diabetes and high blood pressure drugs in ambernath zws 70
Next Stories
1 CoronaVirus : करोनाबाधितांसाठी रुग्णवाहिका मिळेना!
2 CoronaVirus : वसई-विरारमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ
3 पुलांच्या बांधकामांना करोनाची बाधा
Just Now!
X