गाजावाजा करत लोकार्पण केलेल्या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांचा तुटवडा

नीलेश पानमंद/ जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : ठाणे शहरातील करोनाबाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करत सुरू केलेले एक हजार खाटांचे कोविड रुग्णालय पुरेसे डॉक्टर आणि परिचारिका मिळत नसल्यामुळे अजूनही पूर्ण भराने सुरू होऊ शकलेले नाही. लोकार्पण सोहळ्याला आठवडा होत आला तरी या ठिकाणी जेमतेम ४० रुग्णांना दाखल करण्यात आले असून अतिदक्षता कक्ष अजूनही सुरू झालेला नाही. महापालिका प्रशासनातील सावळागोंधळ आणि नियोजनातील अभाव यानिमित्ताने पुन्हा दिसून आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ठाणे महापालिका प्रशासनाला अगदी सुरुवातीपासून पुरेशा प्रमाणात यश मिळालेले नाही. होकारात्मक रुग्णांना उपचारासाठी शहरात खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर पुढे येत असून विलगीकरण केंद्रातील सोयीसुविधांचा मुद्दाही सातत्याने उपस्थित केला जात आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या कोविड रुग्णालयांमधील वाढीव बिलांमुळे प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे. अशातच प्रशासकीय प्रमुखांकडून काढल्या जाणाऱ्या अजब आदेशांच्या मालिकेमुळे सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे.

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी आदेश दिल्याने महापालिकेने शहरातील विकासकांच्या मदतीने माजिवडा भागातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे तात्पुरत्या स्वरूपात एक हजार खाटांचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात ५०० खाटा विनाऑक्सिजन आणि ५०० खाटा ऑक्सिजनच्या पुरवठय़ासह उपलब्ध आहेत. शिवाय १०० खाटांचा अतिदक्षता विभाग, डायलिसिस सेंटर, तपासणी प्रयोगशाळा अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहाच दिवसांपूर्वी या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.

सेवा देण्यात अपयश

आतापर्यंत या ठिकाणी जेमतेम ४० रुग्णांना दाखल करण्यात आले असून डॉक्टर, परिचारिका उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्था असूनही या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सेवा उपलब्ध करून देण्यात यश आलेले नाही. सध्या रुग्णालयामध्ये ११ डॉक्टर आणि ४७ परिचारिका आहेत.  येत्या दोन दिवसांत आणखी दहा परिचारिका आणि आठ डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

थेट मुलाखती

या रुग्णालयामध्ये ८० ते १०० वैद्यकीय अधिकारी आणि ३५० परिचारिकांची आवश्यता आहे. त्यासाठी महापालिकेने जाहिरात काढली होती. ३५० परिचारिकांनी अर्ज भरले होते, मात्र केवळ २० परिचारिका मुलाखतीला येऊन कामावर रुजू झाल्या. अतिदक्षता विभागासाठी ५१ तज्ज्ञ डॉक्टरांनी अर्ज भरले. त्यापैकी दोनच जण कामावर रुजू झाले. त्यामुळे महापालिका आता थेट मुलाखती घेऊन डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढविण्णार आहे.