स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या रोगांचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत असताना ठाणे, पालघर जिल्ह्य़ांच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच महत्त्वाची साहाय्यक पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रुग्णाचे रक्त तसेच इतर तपासण्या कशा करायच्या असे प्रश्न निवासी डॉक्टरांना पडू लागले आहेत.
ग्रामीण, आदिवासी भागात जाण्यास प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साहाय्यक तयार नाहीत. काहींच्या या भागात बदल्या झाल्या आहेत, पण शहरी भाग सोडून ते बदली झालेल्या ग्रामीण, आदिवासी भागात जाण्यास तयार नसल्याचे समजते. ग्रामीण, आदिवासी भागातील रुग्णांना तात्काळ त्यांच्या भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने गावोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा दिला आहे. या रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर, परिचारिका, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये कमी दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यात येत असल्याने सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते, असे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येते.
ठाणे, पालघर या दोन जिल्ह्य़ांच्या विविध भागांत सुमारे ३५ ते ४० ग्रामीण रुग्णालये आहेत. शासन या रुग्णालयांसाठी दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. मात्र, या रुग्णालयात साधा प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांना वैद्यकीय तपासणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय अनेक रुग्णांवर डॉक्टरांना उपचार करता येत नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले.

पदे भरण्यास उदासीनता
विक्रमगड, मनोर, तलासरी, खर्डी, अंबाडी, बदलापूर ग्रामीण, टोकावडे या ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि साहाय्यक पदे रिक्त आहेत. शहरी भागातील ग्रामीण रुग्णालयातील काही प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या आदिवासी, ग्रामी़ण भागात बदल्या झाल्या आहेत. या दुर्गम भागात जाण्यास कर्मचारी तयार नसल्याने ते वैद्यकीय व इतर रजा घेऊन घरी बसून असल्याचे बोलले जाते. या सगळ्या अनागोंदीवर आरोग्य उपसंचालकांचे लक्ष नसल्याने कर्मचारी मजेत आणि रुग्णांची तडफड होत असल्याची टीका होत आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे जाणकार नागरिकांनी यासंबंधी तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नाही. सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनीही या विषयावर शासनाच्या आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा केला आहे. आरोग्य विभाग ही रिक्त पदे भरण्याविषयी खूप उदासीन आहे, अशी टीका त्यांनी केली.

स्वाइन फ्लूची साथ
कोणत्याही साथीच्या रोगाविषयी ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जाते. अलीकडे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागले आहेत. काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञ नसल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांची ओढाताण होत आहे. रुग्णांना तपासणीसाठी तालुक्याच्या रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात जावे लागते, असे रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या उपसंचालक रावखंडे यांनी सांगितले, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साहाय्यक पदाची किती रिक्त पदे आहेत ते सांगता येणार नाही. पण मुळात १५ ते २५ टक्के पदे ही पूर्वीपासून रिक्त आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे ती थेट भरतीने भरता येत नाहीत. रिक्त पदांचा आढावा घेण्याचे काम आदिवासी विकास मंत्री, सचिवांकडून सुरू आहे.