रुग्णालयांकडून कापडाच्या ताग्यांची घाऊक पद्धतीने खरेदी

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका, नगरपालिकांच्या अखत्यारीत असलेल्या स्मशानभूमींमध्ये काही खासगी स्वयंसेवी संस्था अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे काम करतात. या संस्थांकडे गेल्या दीड महिन्यांपासून पार्थिवावर टाकण्यासाठी लागणारे पांढरे कापड उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. घरातील अडगळीत, कपडय़ांच्या बस्त्यात बांधून ठेवलेल्या पांढऱ्या कापडाचा वापर करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, ठाणे महापालिकांच्या हद्दीत अनेक खासगी स्वयंसेवी संस्था पालिकेच्या अखत्यारीतील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य ठेवतात. या संस्था विविध ठिकाणांहून गरजेप्रमाणे साठा मागवून घेतात.

राज्यातील अनेक भागांत करोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढू लागल्याने करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी मोठय़ा संख्येने घाऊक कपडा व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या कापडाचे तागे खरेदी केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर कपडा व्यापाऱ्यांना पांढरे कापड मिळणे मुश्किल झाले. तसेच दीड महिन्यापासून टाळेबंदी असल्याने वाहतूक बंद आहे. घाऊक पद्धतीने हा कपडा घेऊन येणारे ट्रक या कपडय़ाची वाहतूक करू शकत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.

टाळेबंदीमुळे यंत्रमाग बंद

मृतदेहावर टाकण्यात येणारे पांढरे कापड भिवंडी, मालेगाव, सुरत आणि यंत्रमाग असलेल्या राज्याच्या भागांमध्ये तयार केले जाते. हे कापड तयार केल्यानंतर या कापडावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ते अहमदाबाद येथे पाठविले जाते. गेल्या दीड महिन्यांपासून टाळेबंदीमुळे यंत्रमाग बंद आहेत. कापडासाठी कच्चा माल येत नाही. तयार झालेल कापड वाहतूक बंदीमुळे अहमदाबादपर्यंत प्रक्रियेसाठी पाठविले गेले नाही. या कापडाचा काही साठा उपलब्ध होता, तो दीड महिन्यांत घाऊक पद्धतीने रुग्णालय सेवेसाठी खरेदी करण्यात आला, असे यंत्रमागाशी संबंधित एका व्यावसायिकाने सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अखत्यारीत १५ हून अधिक स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींमध्ये पालिकेने स्वयंसेवी संस्थांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे सामान ठेवण्याची मुभा दिली आहे. रहिवाशांना एकाच ठिकाणी साहित्य उपलब्ध व्हावे हा यामागील उद्देश आहे. या संस्थांकडील पांढऱ्या कापडाचा साठा संपला आहे.

-प्रकाश ढोले, व्यवस्थापक, मालमत्ता विभाग, कडोंमपा

करोना रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालय, पोलिसांनी पांढरे कापड घाऊक प्रमाणात खरेदी केले. स्थानिक कपडा दुकाने दीड महिन्यापासून बंद आहेत. तिरडीसाठी लागणारे बांबू, बांबू पट्टय़ा, मडके, शेणगोवऱ्या, चटई आदी साहित्य उपलब्ध आहे. पण पांढरे कापड उपलब्ध नाही.

-संजय मिस्त्री, अंत्यसंस्कारासाठी साहित्य पुरविणाऱ्या संस्थेचे कर्मचारी