श्रीराम रेसिडेन्सी, स्थानक रोड, अंबरनाथ (पूर्व)

२००५ पूर्वी अंबरनाथमध्ये परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होती. रेल्वे स्थानकापासून जवळ असलेले ‘श्रीराम रेसिडेन्सी’ हे संकुल त्यापैकीच एक. स्थानकापासून जवळ असूनही हा परिसर शांत, रमणीय आणि सुंदर आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला भाग म्हणजे शिवधाम. याच भागात २००५ मध्ये पनवेलकर प्लाझा हे व्यावसायिक संकुल उभे राहिले. त्यालाच लागून तीन इमारतींचे गृहसंकुल म्हणजे श्रीराम रेसिडेंसी होय. सात मजल्यांच्या या गृहसंकुलात एकूण ७८ सदनिका आहेत. जवळपास ३०० हून अधिक लोकसंख्येच्या या संकुलात मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय अशी संमिश्र वस्ती आहे. शहरातील काही सोन्याचे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि शासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारीही येथे राहतात. त्यामुळे काही अंशी उच्चभ्रूंची वस्ती म्हणूनही श्रीराम रेसिडेंसी ओळखली जाते. अशा लोकांच्या वास्तव्यामुळे येथे संकुलाची व्यवस्थाही तशी राखली जाते. संकुलाच्या आवारात एक छोटेसे उद्यान असून त्याची अगदी चोख निगा राखल्याने संकुलाच्या सौंदर्यात भर पडते. संकुलाच्या आवारात एक तरणतलावही आहे. आता उद्यान आणि तरणतलाव म्हटला की पाण्याचा अधिक वापर आलाच. मात्र सोसायटीच्या आवारात असलेली एक विहीर येथील पाण्याची गरज भागविते. याच विहिरीतून उद्यान आणि तरणतलावासाठी पाणी घेतले जाते.

त्यामुळे उच्चभ्रूंच्या वस्तीत पाण्याचा गैरवापर होतो, हा समज या सोसायटीने खोडून काढला आहे. पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवत त्यासाठीचे प्रबोधन सोसायटीच्या वतीने अनेकदा करण्यात येते. सोसायटीच्या आवारात विविध चित्रांच्या माध्यमातून पाणीबचतीचे संदेशही देण्यात आले आहेत. प्रवेशद्वार असो वा उद्वाहन सर्वच ठिकाणी असे संदेश आपल्याला पाहायला मिळतात. इतकेच नव्हे तर सोसायटीने पाणी अपव्ययाचा दंड रहिवाशांसाठी ठरवून दिला आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्याला बाराशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. त्यात नळ गळके असणे, झाडांना अतिरिक्त पाणी टाकणे, पाण्याचा अनावश्यक वापर आदी बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पाण्याप्रमाणेच स्वच्छतेच्या बाबतीतही सोसायटीने काही नियम पाळले आहेत. त्यामुळे येथील स्वच्छता नजरेत भरते.

स्वच्छता आणि पाणीबचतीच्या उपक्रमांसह सोसायटीत दिसणारी विविधतेतील एकता इतर सण-उत्सवांच्या माध्यमातूनही पाहायला मिळते. प्रजासत्ताक दिन, होळी, स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव अशा सणांच्या माध्यमातून सोसायटीतील सर्वच रहिवासी एकत्र येतात. सोसायटीत राहणारे लोक अनेक विचारांचे असले तरी संकुलाच्या कामकाजात मतभेद होत नाहीत. एरवी प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यांनी एकत्र यावे, त्यांच्यातील संवाद वाढावा म्हणून सोसायटीत स्नेहमेळावा आयोजित केला जातो. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीनेही सोसायटीत दोन पिढय़ांमधला संवाद कायम राहत असल्याचे येथील जुनेजाणते सावंतकाका सांगतात. सोसायटीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येथील अध्यक्षांचाही मोलाचा सहभाग आहे. २००६ मध्ये स्थापन झालेल्या या सोसायटीत माणिकराव गोडसे यांनी पहिल्यांदा अध्यक्षपद भूषविले. सध्या दिवाकर कंचन हे अध्यक्ष असून रहिवाशी त्यांच्याही कारभाराविषयी समाधान व्यक्त करतात. सोसायटीतील आपलेपणा टिकवण्यात येथील रहिवाशांचा मोलाचा वाटा असल्याचे दिवाकर सांगतात. येत्या काही दिवसांत सोसायटी काही सामाजिक उपक्रम राबविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. थोडक्यात पर्यावरणस्नेही उपक्रम राबविणारी, शेजारधर्माचा बूज राखणारी, उत्सवप्रिय सोसायटी म्हणून ‘श्रीराम रेसिडेन्सी’ची अंबरनाथमध्ये ओळख आहे.