श्री गोपीनाथ सोसायटी, देवीचापाडा, गोपीनाथ चौक, डोंबिवली (प). 

डोंबिवली पश्चिम विभागात शहराच्या वेशीवर ‘श्री गोपीनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ आहे. इमारतीची उभारणी होऊन पंधरा वर्ष झाली. या सोसायटीत ६३ मराठी भाषक कुटुंबे राहतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातील कुटुंबे येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत.

डोंबिवली पश्चिमेकडचे हे शेवटचे टोक. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सोसायटीचा परिसर म्हणजे भातशेती, उजाड माळरान आणि दलदलीने भरलेला होता. बाजूला उल्हास खाडी. या ठिकाणी येण्यासाठी कच्चा रस्ता होता. रिक्षा पकडण्यासाठी गरीबाचापाडा, उमेशनगरला जावे लागत असे. असे सुरुवातीच्या काळातील वातावरण होते. उल्हास खाडीच्या किनाऱ्यावर, मोकळ्या वातावरणात व नागरी वस्तीपासून थोडे दूर असूनही दूरदृष्टीने व धाडसाने या ठिकाणी रहिवाशांनी त्यावेळी सदनिका खरेदी केल्या. नोकरी करणारे, नवीन घराच्या शोधातील चाकरमानी सोसायटीत राहू लागले. सुरुवातीला ‘एमटीएनएल’मध्ये नोकरी करीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी येथे सदनिका खरेदी केल्या. कार्यालयातील चर्चेतून, घराच्या शोधातील अन्य ‘एमटीएनएल’ कर्मचारी येथे निवासासाठी आले. आता तर ‘एमटीएनएल’ वसाहत या टोपणनावाने ही सोसायटी ओळखली जाते.

सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुंदर गोलाकार बाग आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात हिरव्यागार बागेतील पांढऱ्या शुभ्र फुलांनी डवरलेली तगर व अन्य झाडांचे ताटवे म्हणजे सोसायटीच्या चौकात ठेवलेला भव्य पुष्पगुच्छ वाटतो. प्रवेशद्वारात गणपतीचे मंदिर आणि तेथील बैठक व्यवस्था मन प्रसन्न करते. दररोज संध्याकाळी गणेशाची आरती केली जाते. आवारातील स्वच्छता आणि सुस्थितीत वाहनतळावर उभी केलेली वाहने सोसायटीतील शिस्तीची चुणूक दाखवून देते. बागेच्या गोल कट्टय़ावर ज्येष्ठ नागरिक मंडळींचे विरंगुळा ठिकाण आहे. आवारातील प्रशस्त मोकळी जागा सदस्य, ज्येष्ठ नागरिक शतपावली करण्यासाठी, मुले खेळण्यासाठी वापरतात.

वर्षांतील जेवढे सण, उत्सव आपण घरात साजरे करतो. तेवढेच सण, उत्सव घराबरोबर आपल्या सोसायटीच्या आवारात साजरे करण्याची परंपरा या सोसायटीने जपली आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणांबरोबर होळी, दहीहंडी, नवरात्रोत्सव, कोजागरी पौर्णिमा, दिवाळी, तुळशी विवाह असे सगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. घर म्हणून प्रत्येक कुटुंब सण साजरा करीत असले तरी सोसायटी परिवार म्हणून सण, उत्सव साजरे करण्याला सदस्य सर्वाधिक प्राधान्य देतात. एकत्रित येण्याने भेटीगाठी, मनमोकळेपणाची सवय होते.

प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होता येते. हा उद्देश असतो, असे सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत सपकाळ यांनी सांगितले. सचिव मंगेश तावडे, कोषाध्यक्ष अशोक डेरे (वाणी सर) व कार्यकारिणीच्या सहकार्याने सोसायटीचा कारभार पाहिला जातो.

शिक्षकी पेशातील वाणी सर आपली शिक्षकी पेशातील शिस्त सोसायटीच्या जमाखर्चात दाखवून, काटेकोरपणे सोसायटीचा ताळेबंद ठेवतात. या आर्थिक शिस्तीमुळे लेखापरीक्षणात सोसायटी नेहमीच अव्वल राहिली आहे. गावकडच्या ग्रामीण मराठमोळ्या संस्कारात वाढलेले येथील रहिवासी, गावाकडच्या प्रथा, सण, उत्सवाच्या रीतीभाती सांभाळत शहरी जीवनात त्या परंपरांचा तेवढाच सन्मानाने सांभाळ करीत आहेत.

आरोग्य शिबीर, स्नेहसंमेलन

सोसायटी सदस्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून दरवर्षी आरोग्य शिबीर घेतले जाते. सोसायटीला तीन पाखे (विंग) आहेत. कुटुंबातील संस्कार व सोसायटीतील वातावरण म्हणा येथील दोन मुली परदेशात शिक्षण घेत आहेत. सोसायटीतील नव तरुण पिढीसमोर

त्यांचा आदर्श ठेवला जातो. सोसायटीचा वार्षिक सोहळा म्हणून स्नेहसंमेलन असते. या दिवशी अख्खी सोसायटी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या उत्सवाच्या यशस्वितेसाठी झटते. या दिवशी विविध स्पर्धा, महिलांचे कार्यक्रम, गुणवंत विद्याथी, सदस्यांचा सन्मान, समूह भोजन असे कार्यक्रम असतात. क्रीडा क्षेत्रात मागे नको म्हणून सोसायटीचा ‘गोपीनाथ प्रीमिअर लिग’ नावाने क्रिकेट संघ आहे. विविध वयोगटातील सदस्य क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटतात. तात्त्विक, वैचारिक मतभेद बाजुला ठेऊन सोसायटी एक परिवार म्हणून अखंड व आनंदी राहील याकडे सदस्यांचा कटाक्ष असतो. ही परंपरा मागील पंधरा वर्षांपासून पाळली जाते. ६३ कुटुंबातील प्रत्येक घरात चार सदस्य पकडले तरी चार मते प्रत्येक घरात आहेत. हे हेरून राजकीय मंडळी या सोसायटीला सुविधांमध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घेतात.