News Flash

खाऊखुशाल : घरगुती चवीचा नाश्ता

मालवणी आस्वाद स्नॅक्स कॉर्नरला महिला आपल्या घरच्यांसारखे पदार्थ बनवितात.

जगभरातील मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये स्वयंपाकघरात पुरुषांचाच वरचष्मा असला तरी महिलांच्या हातच्या चवीला त्याची सर येत नाही. त्यामुळे जेवण असो वा सकाळ-संध्याकाळचा नाश्ता मिळण्याचे ठिकाण महिला संचालित कॉनर्सभोवती खवय्यांचा गराडा पडलेला असतो. अशी ठिकाणे छोटी असली तरी एकमेकांच्या शिफारशीने त्याची चौफेर कीर्ती पोहोचलेली असते. अंबरनाथ पूर्व विभागातील शिवाजीनगरमधील मालवणी आस्वाद हे अशाच प्रकारचे एक ठिकाण आहे.

आपल्या दररोजच्या घरगुती कामातून वेळ काढत स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने शिवाजीनगरमधील सहा महिलांनी मालवणी आस्वाद हे एक स्नॅक्स कॉर्नर सुरू केले असून गेली चार वर्षे ते अखंड सुरू आहे.

आपल्याकडे संध्याकाळच्या नाश्त्याला आता बरेच पदार्थ पसंत केले जाऊ लागले असले तरी बटाटावडय़ाला तोड नाही.

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसी मार्गावर शिवाजीनगर येथे कडू बंधूंच्या प्रसिद्ध गणेश मूर्ती कलाकेंद्रासमोर २०१३ मध्ये मालवणी आस्वाद या स्नॅक्स कॉर्नरची सुरुवात झाली. मंगला घोणे, संगीता उतेकर, वंदना नाईक, सुनीता गावडे, उमा मालुसरे आणि माधुरी घोणे यांनी आपल्या घरच्या कामातून वेळ काढत स्वयंपूर्ण होण्यासाठी हा उद्योग सुरू केला. त्यातून मग पुढे त्यांनी मालवणी आस्वाद या खाद्यपदार्थाच्या व्यवसायाला सुरुवात केली. महिला असल्याने अनेक वर्षांचा चविष्ट जेवण बनवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच. त्यामुळे निरनिराळे पदार्थ बनविण्यात अडचण आली नाही.

या खाद्य उद्योगाची सुरुवात अर्थातच बटाटेवडय़ापासून झाली. आता त्याबरोबरच पाच प्रकारच्या भजी येथे मिळतात.

कांदा, बटाटा, पालक, मूग आणि मिक्स असे पाच भजींचे प्रकार येथे बनवले जातात. अस्सल घरगुती चव येथे आपल्याला अनुभवायला मिळते. आजकाल इतक्या मोठय़ा प्रमाणावर वडापावच्या हातगाडय़ा शहरात पाहायला मिळतात. मात्र बहुतेक ठिकाणी खरी चव लुप्त झाली आहे, कारण अनेक जण फक्त उकडलेल्या बटाटय़ांमध्ये हळद, मीठ, मिरची टाकून वडे बनवितात. ‘मालवणी आस्वाद’मध्ये मात्र बटाटेवडय़ाची अस्सल चव चाखायला मिळते, असे मंगला घोणे सांगतात. वडय़ाची चव बटाटय़ाच्या भाजीत असते. त्यासाठी वापरले जाणारे मसाले महत्त्वाचे असतात.

मिरची, आले, लसूण आणि इतर मसाल्यांचा समावेश केल्याशिवाय आम्ही वडे बनवतच नाहीत. त्यामुळे अस्सल बटाटावडा ही आमची आजही खासियत आहे, असे संगीता उतेकर सांगतात. फक्त पैसे कमावण्याचा हेतू नसल्याने आम्ही ग्राहकांच्या आरोग्याचीही काळजी घेत असतो. त्यामुळेच उत्तम प्रकारचे तेल आणि स्वच्छता राखण्याचा आमचा आग्रह असतो. यासोबत तयार चटणी देण्यापेक्षा आम्ही घरीच बनवलेल्या चटण्या ग्राहकांना देतो. त्यामुळे त्यातही एक घरची चव खवय्यांना येथे चाखायला मिळते, असेही उतेकर सांगतात. स्वच्छता आणि घरच्याप्रमाणे बनवलेले पदार्थ हे ‘मालवणी आस्वाद’चे वैशिष्टय़ आहे. मालवणी आस्वाद स्नॅक्स कॉर्नरला महिला आपल्या घरच्यांसारखे पदार्थ बनवितात. पुन्हा येथील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. फक्त संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यंतच ‘मालवणी आस्वाद’ सुरू असते. दिवसाला ३५० ते ४०० वडे इथे बनवले जातात. सायंकाळी अनेक कार्यक्रमांच्या ऑर्डर्सही या महिलांना मिळत असतात. सायंकाळी एमआयडीसीतील बहुतेक कामगार येथे नाश्त्यासाठी थांबत असतात. त्यामुळे सायंकाळी पाचच्या पूर्वी आम्ही आमची पूर्ण तयारी करतो. दुपारी घरातील काम आवरून तीनच्या सुमारासच आम्ही तयारीला लागत असतो. कोणतेही पदार्थ आम्ही सहसा तयार करून ठेवत नाही. खवय्यांना गरमागरम देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंगला घोणे सांगतात.

दिवाळीच्या काळात घरच्या फराळासोबत आम्ही एकत्र येऊन विक्रीसाठीही फराळ बनवत असतो. गेल्या चार वर्षांपासून आम्ही नियमितपणे फराळ बनवत असून त्याला चांगली मागणीही आहे. त्यासाठी अनेक जण दिवाळीच्या दोन महिन्यांपासूनच आम्हाला कळवत असतात. स्वस्त आणि घरगुती चवींच्या या पदार्थानाही चांगली मागणी असल्याचे संगीता घोणे सांगतात.

श्री विनायकस्टॉल

  • कुठे? आनंदनगर एमआयडीसी रोड, कडू बंधू कला केंद्रासमोर, शिवाजीनगर अंबरनाथ पूर्व
  • कधी ? सोमवार ते शनिवार, सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 2:27 am

Web Title: shri vinayak fast food stall ambernath
Next Stories
1 एसटीसह पालिकेची बससेवा!
2 गोळीबाराच्या संशयावरुन पोलिसांनी ‘त्याला’ स्ट्रेचरवरून फरफटत नेले
3 भिवंडीतील रसायनांची गोदामे सील
Just Now!
X