न्यायदानासारख्या रूक्ष क्षेत्रात कार्यरत राहूनही मनाची सांस्कृतिक श्रीमंती कायम ठेवणाऱ्या
न्या. राजाभाऊ गवांदे यांचे निवृत्तीनंतरच्या काळात ठाण्यात वास्तव्य होते. अल्पावधीतच ठाण्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात ते एकरूप झाले. ठाण्यातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध होते. त्यापैकी एक असलेले ज्येष्ठ लेखक अशोक चिटणीस यांनी रेखाटलेले राजाभाऊंचे शब्दचित्र..

‘चिटणीस सर, तुमच्या घराजवळ महाराष्ट्रातील एक नामवंत न्यायाधीश, उत्तम वक्ता, साहित्यप्रेमी माणूस गेली चार वर्षे राहत आहे. तुम्ही त्यांना भेटा. तुमची त्यांची मैत्रीच होईल!’  हिंदी-मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखक आणि समीक्षक असलेल्या डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर या माझ्या मित्रांनी मला फोनवरून बोलता बोलता सूचना केली होती. त्यांच्याकडूनच मी न्यायमूर्तीचे नाव, पत्ता व फोन नंबर घेतला आणि दुसऱ्याच दिवशी न्या. राजाभाऊ गवांदेंच्या घरी गेलो. लक्ष्मीबाई आणि राजाभाऊंनी मोठय़ा प्रेमाने स्वागत केले. १९९२ साली झालेली ती आमची पहिलीच भेट होती. परंतु, त्याच दिवशी राजाभाऊंच्या घरातून बाहेर पडताना असे वाटले की, आम्ही परस्परांना अनेक वर्षे ओळखत होतो.
११ मार्च १९२९ रोजी कोपरगाव येथे जन्म घेतलेल्या राजाभाऊंचे डोक्यावरचे दाट मागे वळलेले पांढरेशुभ्र ताकासारखे दिसणारे नेटके केस, प्रेमळ व करारीपणाचे मिश्रण असणारे वेधक डोळे, रुंदसर नाक, रुंद चष्मा, पातळ जिवणी, उजळ वाटावा असा सावळेपणाकडे झुकणारा रंग, उंच-रुंद बांधा, पांढरा स्वच्छ शर्ट-लेंगा, वाणीतील स्वच्छता आणि रसाळपणे काहीशा गोष्टीवेल्हाळ वृत्तीने थोरांची (कोटेशन्स) उद्धृते देत बोलण्याची पद्धत, हे सारे सारे मला भावले.
पहिल्या भेटीनंतर लगेचच १ ऑगस्ट १९९२ रोजी राजाभाऊंना प्रमुख पाहुणे म्हणून मी मुख्याध्यापक असलेल्या शाळेत ठाण्याच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिरात लो. टिळकांवर भाषण करण्यास बोलावले. मग पुढील १५-२० वर्षांत मी राजाभाऊंची अनेक भाषणे अनेक समारंभांत संयोजित केली. राजाभाऊ ठाण्यात १९८८ साली राममारुती रोडवरील ‘अर्हत’ इमारतीत राहायला आले होते. १० एप्रिल १९९३ रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.  त्याच सभेत मधु मंगेश कर्णिक, माधव गडकरी आणि मंगेश पाडगावकर यांच्याशी मी राजाभाऊंचा परिचय करून दिला. राजाभाऊंनी कोमसापच्या कार्यात रस घेतला. मधुभाईंनी राजाभाऊंना विश्वस्त म्हणून नियुक्त केले. राजाभाऊंची पंच्याहत्तरी थाटात झाली. मधुभाईंच्या हस्ते सत्कार झाला. राजाभाऊंनी कोमसापला पन्नास हजार रुपयांची देणगी दिली.  
‘आठवणींचा मोहर’ हे राजाभाऊंनी लिहिलेले पुस्तक २००० साली मेहता पब्लिशिंगतर्फे प्रकाशित झाले. तत्पूर्वी ‘टोवर्ड्स अंडरस्टँडिंग गांधी’ हे थोर विचारवंत दि. के. बेडेकर यांनी काढलेल्या टिपणांच्या आधारे लिहिलेले राजाभाऊंचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. राजाभाऊंना ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे भूषण’ हा पुरस्कार लाभला. ‘आठवणींचा मोहर’ला तीन पुरस्कार लाभले. दुर्गा भागवतांनीच त्या पुस्तकाचे शीर्षक सुचविले होते. जवळजवळ रोज राजाभाऊ दुर्गाबाईंशी फोनवरून विविध विषयांवर चर्चा करीत. दुर्गाबाईंचे ते मित्रच होते.
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीच्या आठ भावंडांच्या घरात आई-वडिलांच्या संस्कारात राजाभाऊ शिष्यवृत्ती मिळवून व लहान-मोठय़ा नोकऱ्या करीत वाढले. दोन वर्षे सानेगुरुजींचा सहवास, राष्ट्र सेवादलातील वावर, सोनोपंत दांडेकर, प्रा. न. र. फाटक, लॉ कॉलेजचे प्राचार्य पंडित यांचे संस्कार घेत धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, समीक्षा यांच्या वाचनाने राजाभाऊही श्रीमंत होत गेले. दत्तो वामन पोतदार, डॉ. रा. शं. वाळिंबे, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, आ. अत्रे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, कॉ. डांगे यांच्या वक्तृत्वाचा त्यांनी अभ्यास केला. स्वत:ला एक वक्ता म्हणून घडविले. नेतृत्वाच्या गुणांनाही त्यांनी विद्यार्थिदशेत खतपाणी घातले.  
१९५२ ते १९५८ या काळात राजाभाऊंनी वकिली केली. १९५९ ते १९८८ पर्यंत न्यायिक सेवा केली. १० वर्षे ते पुण्यात, १० वर्षे महाराष्ट्रात अनेक गावी आणि १० वर्षे मुंबईत राजाभाऊ जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. चंद्रकांत काकोडकरांच्या ‘श्यामा’ कादंबरीवर अश्लीलतेचा खटला झाला. त्या संदर्भात न्यायमूर्ती राजाभाऊंनी दिलेला निकाल ऐतिहासिक ठरला. आचार्य अत्रे आणि ना. सी. फडके यांची साक्ष त्यांनी काढली होती. वेळ पडली तेव्हा त्यांनी ना. सी. फडके यांना दटावणीही केली.
आईने दिलेली चारित्र्यसंपन्नतेची शिकवणूक  राजाभाऊंनी आचरणात आणली. न्यायाधीशाच्या खुर्चीत बसण्यापूर्वी ते रोज मातृवंदना करीत.
आळंदीला इंद्रायणीकाठी त्यांनी ‘संत ज्ञानेश्वर ते तुकाराम’ या विषयावर व्याख्यान दिल्यावर त्यांच्या अंगावर समाधीवरील भरजरी शाल पांघरली गेली. ही शाल त्यांच्या घरी आलेल्यांना ते अतिशय भारावल्या मनाने दाखवीत. अतिशय संवेदनक्षम व पापभीरू मनाने वावरताना मी त्यांना ठाण्यात पाहिले. मधु मंगेश कर्णिक त्यांना ‘श्रीमंत पारिजात’ म्हणाले होते. राजाभाऊंच्या लेखनास दुर्गा भागवतांनी ‘सहजोद्गार’ म्हटले होते. मंगेश पाडगावकरांनी राजाभाऊंना एका पत्रात ‘तुम्ही तुमच्या वैचारिकतेला कुठेही सभारंजकतेचा धक्का लागू दिलेला नाही,’ असे म्हटले होते. असा दुर्मीळ व्यक्तीचे निधन हे साऱ्या समाजासाठी दु:खद ठरते. नुकसानीचे मोजमाप करता येत नाही.