क्रिकेट या खेळाला लाभलेली लोकप्रियता आणि ग्लॅमरमुळे आपल्या इथे नेहमीच अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंची प्रतिभा झाकोळली जाते. मात्र, त्यांनी मिळवलेल्या यशाचे महत्त्व नेहमीच अबाधित राहते. टेबल टेनिस या खेळाबाबतही असेच झाले असून अनेक खेळाडू या खेळात आपले नशीब अजमावत यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. ठाण्यातही टेबल टेनिसमधला एक उगवता तारा सध्या यशाच्या शिखरावर असून नुकतेच त्याने टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे. हे अजिंक्यपद मिळवल्याने तो अठरा वर्षांखालील वयोगटात देशाचा क्रमांक एकचा अग्रमानांकित खेळाडू झाला आहे. ठाण्यात राहणाऱ्या १७ वर्षीय सिद्घेश पांडेला भविष्यात केवळ ऑलिम्पिकमध्येच यश मिळवायचे नसून भारताचे प्रतिनिधित्व करण्याबरोबरीनेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही अग्रमानांकित खेळाडू म्हणून नाव कमवायचे आहे. सिद्धेशचे सध्याचे यश व पुढील वाटचाल याबाबत जाणून घेण्यासाठी त्याच्याशी ही खास बातचीत.

राष्ट्रीय अजिंक्यपद कसे मिळवलेस?

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया या टेबल टेनिसच्या शिखर संस्थेतर्फे मानांकन स्पर्धा घेण्यात येते. यात पाच मानांकन स्पर्धा व शेवटची सहावी ही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा असते. या सहाव्या स्पर्धेत देशातील अव्वल अग्रमानांकित खेळाडू एकमेकांशी लढत देतात. त्यामुळे या स्पर्धेला टेबल टेनिसच्या खेळाडूंमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही स्पर्धा यंदा हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथे २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पार पडली होती. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास एक हजार खेळाडू सहभागी झाले होते. यात प्रत्येक राज्यातील पहिल्या पाच क्रमांकाचे खेळाडू व भारताच्या प्रथम दहा खेळाडूंना थेट प्रवेश मिळतो. माझा देशात क्रमांक चौथा असल्याने मीही यात सहभागी झालो होतो. या वेळी मी नेहमीप्रमाणेच आत्मविश्वासाने खेळलो. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या मानव ठक्करसोबत माझी अंतिम लढत झाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत मी मानववर ४-२ असा विजय मिळवला. त्यामुळे मला अठरा वर्षांखालील गटात टेबल टेनिसचे राष्ट्रीय अजिंक्यपद मिळाले. तसेच या गटाचे क्रमांक एकचे मानांकन व आंतराष्ट्रीय क्रमवारीत माझे १४२ वे स्थान निश्चित झाले आहे.

आठवीनंतर शाळा सोडण्याचा निर्णय कसा घेतलास?

हा निर्णय माझ्या आयुष्यातील धाडसी निर्णयांपैकी एक निर्णय आहे. याचे श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते. आई-वडिलांनी एकत्र निर्णय घेतल्यानेच हे शक्य झाले. मी आठवीपर्यंत ठाण्याच्या ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होतो. या काळात अनेक स्पर्धामध्ये मला सहभाग घ्यावा लागत असे. जून ते जानेवारी हे सहा महिने हा आंतरशालेय स्पर्धाचा कालावधी आहे. त्यामुळे शाळेतील जून ते जानेवारी हे महत्त्वाचे सहा महिने मी शाळेपासून बाहेर असायचो. त्यामुळे झालेला अभ्यासक्रम व प्रात्याक्षिके पूर्ण करणे यात मी वेळ कमी मिळाल्याने मागे पडायचो. अखेर शाळेसाठी वेळ कमी पडू लागल्याने माझ्या पालकांनी मला बाह्य़ शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मी शाळा सोडून दिली आणि एनसीईआरटी दिल्ली बोर्डाच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगमध्ये प्रवेश घेतला. जो विद्यार्थी वेगळ्या ध्येयामुळे शिक्षणापासून काहीसा लांब गेला असेल, त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या अभ्यासक्रमातर्फे संधी मिळते. हा अभ्यासक्रम कठीण असतो, मी मेहनत घेतली व दहावीला ८४ टक्के मिळवले. त्यामुळे शाळा सोडल्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. उलट याच काळात मी खुल्या गटातल्या मोठय़ा टेबल टेनिस स्पर्धा खेळलो व सुवर्ण पदके मिळवली. कारण, मला टेबल टेनिससाठी जास्त वेळ देता आला.

पालकांचे सहकार्य कितपत मिळाले?

मी तिसरीत असल्यापासून टेबल टेनिस खेळतोय. टेबल टेनिसला घालण्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक वेळी मला आई-वडिलांची साथ मिळाली. माझ्यावर शिक्षणाचा तसेच एवढे गुण मिळव अथवा ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे असा कधी ताण त्यांनी येऊ दिला नाही. त्यांची साथ लाभल्यानेच माझा खेळ उत्तरोत्तर बहरत गेला आहे.  यात माझ्या प्रशिक्षक व बूस्टर्स अ‍ॅकॅडमीच्या संचालिका शैलजा गोहाड यांची मोलाची साथ मिळाली. शिस्तपालनाचे महत्त्व मला त्यांच्यामुळेच कळले. पालक व प्रशिक्षक यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मी आज ताणविरहित व आत्मविश्वासाने खेळतो आहे.

टेबल टेनिस खेळताना कोणत्या अडचणी जाणवतात?

दुर्दैवाने आपल्या देशात क्रिकेट सोडून अन्य खेळांकडे आस्थेने पाहिले जात नाही. क्रिकेटची जितकी चर्चा होते तितकी या खेळाबद्दल कधीच चर्चा होत नाही. आज मला मिळालेले अजिंक्यपद हे नऊ वर्षांनी महाराष्ट्राकडे आले असून ठाणे जिल्ह्य़ात ते प्रथमच आले आहे. असे यश मिळत असले तरी क्रिकेटइतके वैभव कधी दिसत नाही व यामुळे आम्हाला आमच्या भविष्याची एक अनाहूत चिंता सतावत राहते. त्यामुळे क्रिकेटसह अन्य खेळांकडेही शासन व समाजाने सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.

भविष्यातील तुझे ध्येय काय आहे?

राष्ट्रीय गटात जरी अव्वल आलो असलो तरी, पुरुष गटात प्रथम येण्यासाठी इथून पुढे माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगली कामगिरी करायची आहे. त्याचबरोबरीने भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. अगामी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक मिळवण्याची इच्छा लहानपणापासून आहे. येत्या फेब्रुवारीत बहुतेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होण्याची शक्यता असून त्यासाठीची तयारी करणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून अग्रमानांकित खेळाडू होण्याचे माझे महत्त्वाचे ध्येय आहे.