बेशिस्तपणे उभ्या केल्याने गर्दी; राज्यमंत्र्यांचे आदेश बासनात

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौक, पाटकर रस्ता परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कोंडीत अडकून पडत आहे. बाजीप्रभू चौकात ‘केडीएमटी’चा बस थांबा आहे. बस आणि रिक्षा रस्त्यावर थांबत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या खासगी आणि अन्य वाहनांना या भागातून पुढे जाताना कोंडीचा सामना करावा लागतो.

सकाळी नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलीस नसतात. त्यानंतर संध्याकाळी चारनंतरही वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक या ठिकाणी सेवा देत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक मनमानी करून या भागात प्रवासी वाहतुकीसाठी स्पर्धा करतात. रिक्षा बेशिस्तपणे उभ्या करतात. इंदिरा चौकात गांधीनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमध्ये जाणाऱ्या रिक्षा दोन रागांच्या मध्ये लागतात. त्याच वेळी या चौकाच्या दुसऱ्या बाजूला टाटा नाका, गोळवली, कल्याणकडे जाणाऱ्या रिक्षा रस्त्यात उभ्या केलेल्या असतात. वाहनांची या चौकातील घुसमट विचारात घेऊन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाच महिन्यांपूर्वी वाहतूक, ‘केडीएमटी’, ‘आरटीओ’, पालिका अधिकाऱ्यांसह डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात संयुक्त दौरा केला होता. त्या वेळी बाजीप्रभू चौकातील ‘केडीएमटी’चा बस थांबा नेहरू रस्त्यावरील उद्यानासमोर हलविण्याचे आदेश दिले होते. एमआयडीसी निवासी, कल्याण, खोणी भागात जाणाऱ्या ज्या बसची वेळ असेल तीच बस फक्त बाजीप्रभू चौकात आणण्याचे ठरले होते. या दोन्ही चौकांमधील रिक्षाचालकांना चिमणी गल्लीतील पाटकर प्लाझामधील तळाच्या आणि पहिल्या मजल्यावरील वाहनतळावर जागा देण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. रिक्षांसाठी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील स्वच्छतागृहाच्या भागात पालिकेची संरक्षक भिंत तोडून वाहनतळ करण्याच्या सूचना केल्या होत्या. पाच महिने उलटले तरी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या एकाही आदेशाचे पालन वाहतूक, आरटीओ, पालिका अधिकाऱ्यांनी केलेले नाही. जे अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करीत नाहीत ते सामान्यांच्या तक्रारींची काय दखल घेणार, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

केळकर रस्त्यावर प्रश्न गंभीर

मानपाडा, लोढा हेवन, गोग्रासवाडीतील रहिवासी केळकर रस्त्यावर जाण्यासाठी रिक्षात बसले की तिथेच त्यांच्याकडून पैसे घ्यावेत.प्रवासी उतल्यानंतर चालकाला भाडे देतात. त्यांच्यात खटके उडतात. त्या रिक्षाच्या मागे अनेक वाहनांची रांग लागते. आधीच भाडे घेतलेले असल्यास ही गर्दी टाळता येईल.

बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा येथील वाहनतळ सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन, आरटीओ यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कागदोपत्री वाहनतळ सुरू करण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाहतूक विभाग या दोन्ही यंत्रणांच्या सहकार्याने वाहनतळात रिक्षाचालकांना जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली करील.

– एस. एन. जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग