गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या १५ वर पोहचल्यामुळे धास्तावलेल्या बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करोनाची लागण झाल्याच्या संशयावरुन क्वारंटाइन केलेल्या १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. बुधवारी रात्री १४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले, ज्यात कोणालाही करोनाची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं. त्याआधी दोन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन दिवसांत बदलापुरात एकही करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. शहरवासियांसाठी ही समाधानकारक बाब असली, तरीही येत्या काही दिवसांपर्यंत सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं मत नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी, मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी म्हमून काम करणाऱ्या बदलापुरातील दोघांना करोनाची लागण झालेली आहे. दोन्ही कामगार हे मित्र असून ते रोज सोबत प्रवास करत होते. महापालिका प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या चाचणीत दोघांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे प्रशासनाचा जीव काहीसा भांड्यात पडला आहे.

अवश्य वाचा – मुस्लिम व्यक्तीकडून सामान घेण्यास नकार, मिरा रोडमध्ये एकाला अटक

याआधी बदलापूरमधील पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व तिच्या मुलीला करोनाची लागण झाली होती. यानंतर या दोघींच्या संपर्कात आलेल्या ८ नातेवाईकांनाही करोनाची लागण झाली. याव्यतिरीक्त वोकहार्ट रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही करोनाची लागण झाली होती. यानंतर केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका लॅब टेक्निशीअनला आणि सायन रुग्णालयात पाठदुखीसाठी दाखल झालेल्या बदलापूरच्या रुग्णाला करोनाची लागण झाली होती.